पिंपरी I झुंज न्यूज : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
“पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजना; तसेच विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. वाढीव खर्चांना मंजुरी, पंतप्रधान आवास योजना, घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी डेपोपर्यंत वाहतूक करणे, निगडी भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर, चिखलीतील संतपीठ, मोकाट व भटक्या कुत्र्यांवर संतती नियमन शस्त्रक्रियांचे काम, अनाधिकृत जाहिरात फलक काढणे, खाजगी केबल नेटवर्किंगसाठी रस्ते खोदाई, यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई, रुग्णालये उभारणी व यंत्रसामुग्री खरेदी आदी अनेक कामांमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे भापकर यांनी पत्रात नमूद केले आहे.