पिंपरी I झुंज न्यूज : रेडबड मोशन पिक्चर्स निर्मित दारिद्र्याच्या छायेखाली राहणाऱ्या शाळाबाह्य चिमुकल्यांचं देशप्रेम दर्शविणारा “निशाण” हा लघुपट भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या सामाजिक आशय असलेल्या डोळ्यांत अंजन घालणाऱ्या लघुपटाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटात मुख्य भूमिका साकारणारा गौरव कदम ला उत्कृष्ट अभिनयाबद्दल अमेरिकन गोल्डन पिक्चर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने “बेस्ट चाईल्ड अॅक्टर” म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबद्दल नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती निकम, बर्थडे आहे भावाचा फेम प्रसिद्ध गायक शेखर गायकवाड, निशाण लघुपटाचे दिग्दर्शक, सीए अरविंद भोसले, अभिनेता रोहीत पवार यांच्या हस्ते गौरव कदम चा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिवा हरळ, गौरव चे वडील जनार्दन कदम, शाळेच्या शिक्षिका वंदना केदार, सुजाता इंगवले, कल्पना काशीद, रश्मी दंडेल, स्वाती खाटेकर, साधना आंबवणे, अनिता थिटे,अनिता अब्दुले आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
“गौरव कदम हा नेहरूनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीमध्ये राहण्यास असून तो पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर येथील शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. गौरव कदम याने प्रथमच कॅमेऱ्यासमोर अभिनय केला आहे. त्याच्या या अभिनयाबद्दल व त्याला जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
या लघुपटाचे लेखन, व दिग्दर्शन सीए अरविंद भोसले यांनी केले आहे.याचे संपादन पिंपरीतील एपिएच स्टुडिओच्या संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे.