लोणी काळभोर I झुंज न्यूज : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील समर्थ हॉस्पिटलचे मालक संतोष विजय ननावरे (वय-४०) यांचे सोमवारी (ता. १२) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
संतोष ननावरे हे कोरोना व स्वाइन फ्लूच्या आजाराने त्रस्त झाले होते. त्यांच्यावर मागील एक महिन्यापासून युवक हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल व दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मावळली. संतोष ननावरे यांचे मुळ गाव हे सातारा जिल्ह्यातील लोणंद आहे. मागील काही दिवसांपासून ते कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात वास्तव्यास होते.
कुंजीरवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीत मागील १० वर्षांपासून त्यांचे समर्थ हॉस्पिटल नावाने रूग्णालय आहे. उत्तम हाडाचे डॉक्टर म्हणून पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, पेठ, नायगाव, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, उरूळी कांचनसह परिसरात परिचित होते. त्यांच्या जाण्याने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन लहान मुली असा परिवार आहे.
दरम्यान , कोरोनामुळे मागील दोन वर्षांच्या काळात पूर्व हवेलीतील तीन डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये कदमवाकवस्ती (लोणी स्टेशन) येथील प्रसिद्ध एम. बी. बी. एस. डॉक्टर शिवराम शंकर गजरमल, कुंजीरवाडीतील वानखडे हॉस्पिटलचे मालक बी. एच. एम. एस. प्रभाकर वानखडे व कुंजीरवाडीतील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ संतोष ननावरे या तीन डॉक्टरांच्या जाण्याचे पूर्व हवेलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.