राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन सविस्तर माहिती ; जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि आजचा शुभमुहूर्त ?

“राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे. या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते की, या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली. रक्षाबंधन माहिती नेमकी काय आहे? त्याचा इतिहास काय आहे? याचे नक्की काय महत्त्व आहे जाणून घेऊया. राखी पौर्णिमा मराठी माहिती खास तुमच्यासाठी.

‘रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख – सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे.

आपण अनेकदा पाहतो की, बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करते, ती स्वतःचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती, मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कतृत्त्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या रक्षणाची आणि कुटुंबीयांची जबाबदारी आपल्यावर आहे अशी कृतज्ञता यातून व्यक्त करण्यात येते. सहसा ही पद्धत उत्तर भारतामध्ये दिसून येते. आता तर नक्कीच काळ पूर्णतः बदलला आहे. भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा-बहिणीच्या या प्रेमाच्या ‘रक्षाबंधन’ या सणाचे महत्त्व कायम आहे. आता तर सोशल मीडियाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन शुभेच्छा संदेशही पाठवले जातात.

रक्षाबंधनचं धार्मिक महत्त्व

कोणत्याही धाडसी, शूरवीर अशा पुरूषाने आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे, दुर्बल, वृद्ध, आबाल, अपंगांचे रक्षण करणे हा धर्म समजण्यात येतो. पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण पौर्णिमेला भटजी अर्थात पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद हे पवित्र मानण्यात येतात. या रक्षाबंधन सणाला धार्मिक महत्त्वदेखील आहे. मध्ययुगीन भारतामध्ये बाहेरील आक्रमणांपासून महिलांचे रक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे. त्याकाळी अनेकवेळा मुसलमानांचे आक्रमण होत असे. त्यामुळे रक्षणकर्त्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या या पवित्र संस्कृतीला तेव्हापासून धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. तर याच दिवशी महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठीही हा सण खास असतो. वरूण राजाची आराधना करत त्याला या दिवशी पूजण्यात येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक आणि चांगल्या कामासाठी अनुकूल मानण्यात येतो.या पौर्णिमेला श्रावणी असेही म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर समाधानी शेतकरी आणि लोक वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव त्याकाळी साजरे करत होते. तर शिक्षण घेण्यासाठी सुरूवात करण्यासाठी हा शुभमुहूर्त काढण्यात येत असे. अध्ययनासाठी आरंभ, शौर्याचे प्रतीक म्हणजे श्रावणी असा अर्थ होतो. हेदेखील या सणाचे धार्मिक महत्त्व आहे.

रक्षाबंधन कथा 

रक्षाबंधनाच्या पौराणिक कथा सांगितल्या जातात. काही जणांना या कथा माहीत आहेत, तर काही जणांना माहीत नाहीत. रक्षाबंधन माहिती मराठी म्हणून खास तुमच्यासाठी या दोन्ही कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरूवात नक्की कधीपासून आणि कशी झाली, याबाबत कोणताच निश्‍चित पुरावा कोणाकडेच नाही. पण त्याविषयी अगदी पूर्वपरंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते. दानवांचा राजा वृत्रासुर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची अर्थात इंद्राणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा ज्याला राखी म्हणतात तो इंद्राच्या हातावर बांधला. या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.
दुसरी कथा म्हणजे बळी नावाचा राजा अश्र्वमेध यज्ञ करत होता. त्याक्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णून वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी बळी राजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळी राजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रुपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळी राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले.
बळी राजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की, मला असा आशीर्वाद घ्या की, इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला. आणि बळी राजासोबत पाताळात राहणे पसंत केले.
देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली . त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला.विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला, त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळी राजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले? त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळी राजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले.त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठविण्याची मागणी केली. त्या दिवसापासून बहीण- भावाचे नाते जपणारा असा हा सण केला जातो.

राखीपौर्णिमेचा इतिहास

राखीचा खूपच जुना इतिहास आहे. आपण याची पौराणिक कथा तर जाणून घेतलीच आहे. तर इतिहासात याचे अनेक दाखले देण्यात येतात. महाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधली आणि त्याचा रक्तस्राव थांबवला. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला आणि आजीवन त्याने दौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.
इतिहासातील दुसरे उदाहरण सांगायचे झाले तर चित्तौढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशाहपासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशाह हुमायूला राखी बांधली होती. राखी बांधल्यानंतर राजा हुमायूने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली असे सांगण्यात येते.

रक्षाबंधनाचे शास्त्र

राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र असल्याचे सांगण्यात येते. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे अनेक भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरूषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतीमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की, सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करत असतात असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.

रक्षाबंधन केव्हा करावे ?

याविषयी अनेकांचे समज-गैरसमज आहेत. याचं कारण असं की, गुरूवार दि.11ऑगस्ट रोजी सकाळी 10: 41 पासून श्रावण पौर्णिमा चालू होते. आणि ती शुक्रवारी (ता. 12) रोजी सकाळी 07:08 वाजता संपते. याच दरम्यान सकाळी 10:41 ते रात्री 08:53 भद्रायोग/विष्टी करण आहे. या काळात शुभकार्य केले जात नाही.

रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त 

या संदर्भात पंचवटी नाशिक येथील कुलकर्णी गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकापती रावणाला त्याची बहिण शूर्पणखा हिने भद्रा (भद्रा – शनीची बहीण) काळात त्याला राखी बांधली आणि वर्षभरात रावणाचा अंत झाला त्याला बहिणीचे रक्षण करता आले नाही अशा अनेक कथा आहेत. म्हणून मग तस असेल तर आपल काय असा प्रश्न अनेक भगिनींना पडला असेल पण चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे हे पहाणे गरजेचे असते.तो त्यादिवशी चांगला म्हणजे पाताळावर आहे म्हणून दोष नाही.वास्तूशांती, लग्न, मुंजी,या सारखे रक्षाबंधन हे शुभकार्य नसून तो सामाजिक उत्सव असल्याने त्याला वेळ पाहाण्याची गरज नसते म्हणून दिवसभरात आपल्या सोयीने केव्हाही रक्षाबंधन करता येईल. पण त्यातूनच पाहिल्यास, दुपारी 12:31 ते 03:31, 05:00 ते 05:30, सायं.06:31 ते 08:37 या वेळेत करावे.

राखी बांधताना म्हणावा हा श्लोक 

येन बद्धो बलीराजा,दानवेंद्रो महाबला | तेन त्वामभिबंधामि,रक्षे मा चल मा चल | असे म्हणावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *