हिंजवडी : आयटीनगरी परिसरात नेरे आणि मारुंजी येथे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, मास्क तसेच उपयुक्त खेळणी वाटप करून अनोख्या पद्धतीने शिक्षकदिन साजरा करण्यात आला. संकल्प फॉर ग्रीन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे संदीप पाल, युवासेनेचे मुळशी तालुका समन्वयक वैभव शितोळे तसेच मिलींद महाडीक, श्रीराम बारसे, बंडू लांडगे, मुदीत तिवारी, रोहिदास काळे, नरेंद्र परदेशी, सिद्धाराम खांडेकर, सौरभ तिवारी उपस्थित होते.
संस्थेने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत आयटीनगरी परिसरातील जांबे ग्रामपंचायत हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची सुमारे आठशेहून अधिक शालेय पुस्तके तसेच शेकडो उपयुक्त खेळणी, शालेय साहित्य जमा करून संस्थेकडे सुपुर्द केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून जमा झालेले सर्व शालेय साहित्य, खेळणी आणि सद्यस्थितीत सुरक्षेसाठी आवश्यक असलेले मास्क, हे संस्थेच्या माध्यमातून नेरे दत्तवाडी येथील सनफ्लॉवर पब्लिक स्कूल आणि आयटीपार्क मधील मारूंजी येथील न्यु इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शिक्षकांनी या अनोख्या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले.
आयटीनगरी परिसरातील सर्वच सामाजिक संस्था, संघटना तसेच कंपन्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे मुळशी युवासेनेचे वैभव शितोळे यांनी सांगितले.