शिवप्रेमी भगिनी अप्सरी शेख व जवानांच्या हस्ते लाल महालात शिवराज्याभिषेक साजरा

पुणे I झुंज न्यूज : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिम समाजातील शिवप्रेमी भगिनी अप्सरी शेख व भारतीय लष्कराच्या जवानांच्या हस्ते सामाजिक समतेचा संदेश देत लाल महालात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

सर्व जाती धर्माचा आदर केला पाहिजे या शिवविचारांची आज देशाला गरज आहे. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने याच शिवविचारांची मशाल पुढील पिढीला देऊयात असे प्रतिपादन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे संस्थापक व संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केले.

शिवराज्याभिषेक हा सुवर्ण दिन व लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे ज्या लाल महालात छत्रपती शिवरायांच बालपण गेले त्या लाल महालाबद्दल शिवप्रेमींच्या मनात एक वेगळे स्थान आहे. अशा या पवित्र लाल महालात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय शिवमहोत्स समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन, अखिल शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समिती यांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक आयोजित केला जातो. 

“शिवराज्याभिषेकाचे लाल महालातील हे ८ वे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या मातीला दोन सुवर्णक्षण बघायला मिळाले. पहिला क्षण जिजाऊंनी पुण्याच्या भूमीत बाळ शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर देऊन पुण्याची भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून समाज परिवर्तनाची पहिली मुहूर्तमेढ पुण्याच्या भूमीत रोवली तो क्षण लाल महालाने अनुभवला. आणि दुसरा क्षण खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वतंत्रता दिवस म्हणून ज्या दिवसाकडे बघितलं जात तो ६ जून १६७४ छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक तो क्षण शिवतीर्थ किल्ले रायगडाने अनुभवला.

लाल महालात शिवराज्याभिषेकाचा हा सुवर्णक्षण लाल महालात समस्त शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. शिवमूर्तीवर शिवगीतांच्या उच्चारात व प्रचंड घोषणा देत पुष्पअभिषेक व किल्यांवरील पवित्र जल तसेच इंद्रायणीच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. शिवराज्याभिषेकाचे पौरोहित्य कैलास वडघुले यांनी केले.

शिवराज्याभिषेक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आयुक्त व सचिव रायगड विकास प्राधिकरणाचे संचालक प्रभाकर देशमुख, मा.दीपकभाऊ मानकर, दत्ताभाऊ सागर तसेच मुस्लिम समाजातील शिवप्रेमी भगिनी अप्सरी शेख, भारतीय लष्कराच्या मराठा रेजिमेंटचे जवान शिवरायांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. एक मुस्लिम महिला व लष्करी जवानांच्या हस्ते शिवरायांना अभिषेक करून पुष्प अर्पण करून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. शिवराज्याभिषेक दिन हा भारतातील लोकोत्सव व प्रेरणादिन आहे. पुढील राज्याभिषेक कार्यक्रमापूर्वी लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी मा. दीपकभाऊ मानकर यांनी केली.

या प्रसंगी बोलताना मा. विकास पासलकर म्हणाले छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेच राज्य निर्माण केलं त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या कोंदणात बांधून संकुचित करू नये कारण जगाच्या इतिहासात असा राजा होणे नाही, नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार, प्रजादक्ष, राष्ट्राभिमान स्वाभिमान, सर्व सामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, केवळ विचारातून नव्हे तर कृतीतून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम या महामानवानं केलं. रायगड प्राधिकरणाचे सदस्य व मा. कोकण आयुक्त मा. प्रभाकर देशमुख यांनी तसेच पुण्याचे माजी महापौर दिपक मानकर यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या समस्त शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवरायांसारख्या जागतिक कीर्तीच्या राजाचा राज्याभिषेक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. शिवरायांच्या जीवन चरित्रातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रचंड मोठी प्रेरणा मिळते असे प्रतिपादन प्रभाकर देशमुख यांनी केले.

शिवराज्याभिषेक कार्यक्रमासाठी मनोज गायकवाड, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वडघुले, प्रशांत धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहर अध्यक्ष मोहिते, दत्ताजी नलावडे, संहयाद्री प्रतिष्ठानचे रवींद्र मोहोळ, यांच्या उपस्थितीत पार पडला. हरियाणा येथून शिवराज्याभिषेक कार्यक्रमासाठी रोड मराठा समाजाचे प्रतिनिधी मा. मांगीराम चोपडे, कॅप्टन अजमेर सिंग, जिलेसिंह खैची बलवीर सिंग उपस्थित होते. निलेश इंगवले, मंदार बहिरट, अक्षय रणपिसे, रोहित ढमाले,सचिन जोशी, नानासाहेब कदम, अक्षय देसाई, अनिल माने, जयंत गायकवाड, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *