वासंतिक व्याख्यानमाला ! मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘पसायदान’ हे नित्यनूतन ; ह.भ.प किसनमहाराज चौधरी यांचे प्रतिपादन

पिंपरी I झुंज न्यूज : “मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे पसायदान हे नित्यनूतन आहे !” असे प्रतिपादन ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २० मे २०२२ रोजी केले.

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘पसायदान’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. माजी नगरसेवक सुरेश भोईर, नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

रमेश इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “वासंतिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन आणि करमणूक यांचा समन्वय साधण्याचे उद्दिष्ट आहे!” अशी माहिती दिली. याप्रसंगी नारायण दिवेकर यांचा ज्ञानेश्वरीचा हस्तलिखित ग्रंथराज सिद्ध केल्याबद्दल आणि सुदाम गुरव यांचा वधू-वर मेळाव्याचे भव्य आयोजन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला; तसेच मे महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.

ह.भ.प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी !’ असे संतवचन आहे. उच्चवर्णीयांनी बहिष्कृत केल्यामुळे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही भावंडे पैठण येथे शुद्धिपत्र घेण्यासाठी गेले असताना वडीलबंधू अन् गुरू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांचा भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कथन केल्यावर माउलींनी निवृत्तीनाथांकडे पसायदान मागितले.

“पसायदान म्हणजे एका संताने आपल्या गुरूंच्या माध्यमातून भगवंताकडे मागितलेला प्रसाद होता. अर्थातच स्वतःसाठी काहीही न मागता त्यांनी संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, असे दान मागितले. सर्वसामान्य प्रापंचिक माणसे देवाकडे सामान्य गोष्टींची मागणी करतात; परंतु ज्ञानेश्वरमाउली हे अलौकिक संत असल्याने त्यांचे मागणेही असामान्य होते. ‘आता’ या शब्दाने कर्तव्यपूर्तीचा आनंद व्यक्त करून माउलींनी दुष्टांचा दुष्टपणा नष्ट व्हावा, त्यांचे सत्कर्माप्रति प्रेम वाढावे, एकमेकांविषयी प्रेम वृद्धिंगत व्हावे, अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा, विश्वातील सर्व मानवजात सुखी व्हावी आणि ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळावे, अशी प्रार्थना केल्यावर निवृत्तीनाथांचा रुकार मिळाल्याने ‘ज्ञानदेव सुखिया झाला’ असे वर्णन पसायदानाच्या शेवटी येते.

सामान्य माणसे भौतिक वस्तूंमध्ये सुख शोधतात; परंतु वस्तूनिरपेक्ष सुख माणसाला चिरंतन समाधान देते!” संत नामदेव, तुकाराम, एकनाथ, स्वामी विवेकानंद, सानेगुरुजी, चिंतामणराव देशमुख यांचे संदर्भ, विविध दृष्टांत, बालकवींची कविता उद्धृत करीत विषयाची मांडणी करताना किसनमहाराज चौधरी यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गोपाळ भसे, अरविंद जोशी, उषा गर्भे, जयमाला विभूते, चंद्रकांत पारखी, सुधाकर कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, रत्नप्रभा खोत, मंगला दळवी, भिवा गावडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. हरिभाऊ क्षीरसागर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *