शिरूर I झुंज न्यूज : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य चौकातून रात्रीच्या अकराच्या सुमारास अहमदनगर येथे कत्तलीसाठी दोन मोठ्या बैलांसह एकूण पाच जनावरे घेऊन जाणारा पिकअप पकडण्यात गोसेवा संघ, प्राणीमित्र व शिक्रापूर पोलिसांना यश आले असून शिक्रापूर पोलिसांनी पिकअप चालकास अटक करत ५ जनावरांचे प्राण वाचवित जनावरांना गोशाळेत रवाना केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे असलेल्या चाकण शिक्रापूर रस्त्याने एक पिक कत्तलीसाठी काही जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यानंतर शिवशंकर स्वामी, स्वामींचे अंगरक्षक प्रफुल्ल गायकवाड, प्रतिक भेगडे, हर्षद पाखरे, प्राणीमित्र श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शंकर साळुंके, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, विकास मोरे यांनी शिक्रापूर चाकण चौकात सापळा लावला असता त्यांना एम एच १४ ए झेड ४२५१ क्रमांकाचा संशयित टेम्पो आल्याचे दिसून आले.
त्यावेळी सर्वांनी पिकअप टेम्पो अडविला असता त्यांना त्यामध्ये सुमारे मोठी ५ जनावरे दाटीवाटीने भरलेली दिसून आली. त्यानंतर सदर टेम्पोचालकाकडे चौकशी केली असता त्याने टेम्पोमधील सर्व जनावरे हि चाकण येथील शेलार व्यापाऱ्याने भरुन दिलेली असून सर्व जनावरे अहमदनगर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावेळी शिक्रापूर पोलिसांनी सदर पिकअप जनावरे व चालकासह ताब्यात घेतला.
“याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) रा. सिंहगड रोड संतोष हॉल पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक समीर अल्लाबक्ष शेख रा. बुरानगर अहमदनगर याचे सह जनावरे भरुन देणारा व्यापारी शेलार (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि अज्ञात टेम्पो मालक व जनावरे खरेदी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करत चालक समीर अल्लाबक्ष शेख यास अटक केली तसेच टेम्पो मधील ५ जनावरांना लोणीकंद येथील गोशाळेत रवाना केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.