पिंपरी | झुंज न्यूज : भाई न म्हणाल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारासह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकुन ती खाण्यास भाग पाडली.
हा खळबळजनक प्रकार थेरगावातील गणेशनगर येथे घडला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला.
रोहन वाघमारे या सराईतासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी रोहन हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास गेला.
तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला.