पुणे | झुंज न्यूज : पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पुतळा साकारला आहे. सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकाराचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी शरद पवार यांचा 9 फुटाचा मेटलचा पुतळा बनवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. पुण्यातील आंबेगाव परिसरात पवारांचा 9 फुटाचा पुतळा साकारला आहे. तसंच सुप्रिया शिंदे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी यांचाही मेटलचा पुतळा बनवला आहे.
शरद पवार यांचा मेटलचा पुतळा बनवला जात आहे. त्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आलाय. पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी तब्बल 8 महिन्याचा कालावधी लागला. रोज 10 तास काम करुन हा पुतळा साकारल्याचं शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी सांगितलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी पवारांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचं कौतुक केलं. सुप्रिया शिंदे यांना आतापर्यंत 3 पुरस्कार मिळाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पवारांचा पुतळा बनवण्याचा निर्णय घेतला होता. इंटरनेटवर पवारांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून हा पुतळा साकारल्याचं शिंदे म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळेंकडून कौतुक
पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदेचं कौतुक केलंय.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी सुप्रिया सुळेंची मागणी
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत व्हावी या हेतूने महिला व बालकल्याण विभागानं तालुकास्तरावर वात्सल्य समित्या स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु अनेक ठिकाणी या समित्या अस्तित्वात आल्या नसल्यानं संबंधित महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समित्यांमुळे कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांना मोठा आधार मिळणार आहे.
तरी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की, कृपया जेथे या समित्या नाहीत तेथे त्या स्थापन करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून केलीय.