कोल्हापूर : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूरमध्येही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शेकडो गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांवर गेली असून ३९ फूट ही नदीची इशारा पातळी आहे. त्यामुळे एका रात्रीत दहा फूट पाणी वाढल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. तिलारी दाजीपूर गगनबावडा भागात गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.
पुणे वेधशाळेने येत्या ७२ तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.