जलपूजनाचे राजकारण ? सत्तेच्या खुर्च्या ऊबवणाऱ्यांनी पिंपरीत बसून तारे तोडू नयेत, अन्यथा जशाच तसे उत्तर द्यावे लागले ; धरणग्रस्तांच्या तीव्र इशाऱ्याने व शिवसैनिकांच्या आक्रमकतेने जलपूजनचा नियोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची महापौरांवर नामुष्की !

मावळ I झुंज न्यूज : पिंपरींच्या महापौरांना मावळ तालुक्यातील धरणाच्या जलपूजनाचा अधिकार कोणी दिला? धरणग्रस्तांचे कोणते प्रश्न महापालिकेने सोडविले? अशा फैरी झाडत शिवसेना कार्यकर्त्यांनी जलपूजनाचे राजकारण करुन धरणाला बदनाम केले जाते असा आरोपही केला. सत्तेच्या खुर्च्या ऊबवणाऱ्यांनी पिंपरीत बसून तारे तोडू नयेत. अन्यथा जशाच तसे उत्तर द्यावे लागले असा इशार धरणग्रस्तांनी दिला होता. धरणग्रस्तांच्या तीव्र विरोधामुळे महापौर उषा ढोरे यांच्यावर शनिवारी जलपूजनचा नियोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

मावळातील धरण शंभर टक्के भरल्याने दरवर्षीप्रमाणे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ३० ऑगस्ट रोजी धरणग्रस्त नागरिकांसह जलपूजन केले. त्यावर महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वादग्रस्त टिप्पणी केली. महापौर पिंपरी-चिंचवडच्या प्रथम नागरिक असताना खासदारांनी मावळातील पवना धरणाचे जलपुजन केल्याने महापौरांचा अवमान झाल्याची भूमिका मांडली होती. त्यांच्या या विधानाला पवना धरणग्रस्तांनी तीव्र विरोध केला. धरण उभारणीसाठी आम्ही मोलाची जमीन दिली. बंदिस्त जलवाहिनी योजनेमुळे मावळच्या तीन शेतक-यांचा बळी गेला. अनेकांना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या. असे असतानाही महापालिकेने धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा कधी जाणून घेतल्या नाहीत, असा राग व्यक्त केला.

पवना धरणावर महापालिकेचा काडीमात्र अधिकार नाही. आमच्या समस्या अजूनही तशाच असताना पिंपरीच्या महापौर धरण पुजनाचे नाटक कशासाठी करतात?, त्यांना जलपुजनाचा अधिकार कोणी दिली? सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी जलपूजनाला यावे. धरणग्रस्तांच्या अडी-अडचणी काय आहेत. हे त्यांना दाखवून देऊ. महापौर उषा ढोरे यांचा जलपूजनचा शनिवारी नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी त्या पवना धरणावर जाणार होत्या. त्यापार्श्वभूमीवर धरणग्रस्त संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. महापौरांसमोर समस्यांचा पाढा वाचण्यासाठी धरणग्रस्त नागरिक सकाळपासून महापौरांची वाट बघत थांबले. पण, याची महापौरांना कुणकुण लागताच त्यांनी दौरा रद्द केल्याचा दावा शिवसेना कार्यकर्ते, धरणग्रस्त संघटनांनी केला.

शिवसेना तालुका उपप्रमुख अमित कुंभार म्हणाले, ‘‘धरण मावळाचे आणि त्यावर पिंपरीच्या महापौरांचा अधिकार कसा राहील. त्यांचा अपमान कसा होईल याचे भान सभागृह नेत्याला राहिले नाही. प्रसिद्धीसाठी त्यांनी टीका केली. त्याचा निषेध करण्यासाठी आणि पवना धरणाबद्दल असलेली अस्मिता दाखविण्यासाठी सकाळी सातपासून धरणग्रस्त संघटनेचे रवी रसाळ, मुकुंद काळभोर यांच्यासह आम्ही शिवसैनिक निषेध करण्यासाठी थांबलो होतो. याची कुणकुण लागताच महापौरांनी दौरा रद्द केला.

“महापौरांनी दौरा रद्द केल्याने सर्वांनी निषेध सभा घेतली. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पालिकेने बाधितांना किती नोकऱ्या दिल्या, हे जाहीर करावे. महापालिकेने धरणातील गाळ काढण्यासाठी किती निधी दिला? धरणग्रस्तांना गाळे किती दिले? या सर्व गोष्टी महापौरांनी जाहीर कराव्यात यासाठी आम्ही थांबलो होतो. परंतु, महापालिकेचा एकही अधिकारी, पदाधिकारी फिरकला नाही. वादग्रस्त टिप्पणी कोणी करु नये, धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहे. पवना धरण हे पिंपरी-चिंचवड धरण नाही. त्याच्यावर धरणग्रस्तांचा अधिकार आहे. पिंपरी महापालिकेचा नाही. याचे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी भान ठेऊन विधान करावे.’’, असा सल्लाही धरणग्रस्तांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, तालुका उपप्रमुख अमित कुंभार, आशिष ठोंबरे, चंद्रकांत भोते, मदन शेडगे. समन्वयक रमेश जाधव, महिला संघटिका शैला खंडागळे, तालुका संघटिका अनिता गोंटे, विभाग प्रमुख किसन तरस, राम सावंत, उमेश दहीभात, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, देहू शहर प्रमूख सुनील हगवणे, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, देव खरटमल, सिध्द नलवडे, सतीश इंगवले, युवा अधिकारी श्याम सुतार, तळेगाव महिला आघाडी संघटिका रुपाली आहेर, सुनंदा आवळे, सुरेखा मोरे, माजी सरपंच अनिल भालेराव, शहर शाखा प्रमुख सुरेश गुप्ता,सचिन कलेकर, विकास कलेकर, किशोर शिर्के, अंकुश वागमारे, उमेश ठाकर, पोपट राक्षे, युवराज सुतार, धरणग्रस्तांचे नेते रविकांत रसाळ, मुकुंद कौर, किसन घरडाले, शंकर दळवी, छबन काळे, बाजीराव शिंदे, छाया काळेकर, लिलाबाई डोंगरे, राम काळेकर, सरपंच सुनील येवले, आकाश वाळुंज, ग्रा .प .सदस्य रुपाली इंगवले सर्व शिवसेना महिला आघाडी युवा सेना व भा .वि .से .युवती सेना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *