चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू .. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस. दूरदर्शन मालिका, लेखन, चित्रपट, नाटकं अशा सगळ्या माध्यमात सहजतेनं अभिनय करत आपल्या प्रतिभेचा ठसा त्यांनी सर्वांवर उमटवला. वयाच्या ७२ व्या वर्षीही ते आपणा सर्वांना त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध करतात.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली.
‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘नातीगोती’, ‘जावई माझा भला’, ‘कलम ३०२’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या आहेत. नाटकांसोबतच त्यांनी ‘चिमणराव’ या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ‘टुरटुर’ आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या त्यांनी केलेल्या आणखी काही मालिका. यातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. टिपरेआबा तर घराघरात लोकप्रिय झाले. चि. वि. जोशी यांच्या अजरामवर चिमणराव गुंड्याभाऊ या पात्रांवर काढलेल्या त्याच नावाच्या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ‘चौकट राजा’, ‘सरकारनामा’, ‘एक डाव भुताचा’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या.
प्रभावळकरांनी जरी मालिका केल्या असल्या तरी त्यांना नाटक आणि चित्रपटात काम करणेचं जास्त भावते. ते म्हणतात, मालिकांच्या माध्यमातून आपण घराघरांत पोहोचतो आणि कुटुंबाचा एक भाग बनतो, असे असले तरीही मला स्वत:ला चित्रपट आणि नाटक अधिक आवडते. कारण मालिकांमध्ये मार्केटिंगचे वर्चस्व वाढल्याने त्यात कल्पकतेला वाव राहिलेला नाही. प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. ‘गुगली’, ‘हसगत’ या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत.
कोणत्याही अभिनेत्याला हेवा वाटावा अशी या रंगकर्मीची गेल्या कित्येक वर्षांची दमदार वाटचाल राहिली आहे. भूमिकेचा गाभा व आवाका समजावून घेऊन आणि त्या भूमिकेत अक्षरशः शिरुन त्यातील सूक्ष्म बारकाव्यांनिशी व लकबींसह प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. खरं तर नाटकाच्या प्रयोगानंतर या अशा आव्हानात्मक भूमिकांमधून बाहेर पडून ‘दिलीप प्रभावळकर’ या आपल्या स्वतःच्या ‘भूमिके’चं बेअरिंग सापडणंच त्यांना त्यांच्या अभिनयकारकीर्दीतील आरंभकाळात कठीण होत असे अशी त्यांची नोंद सुध्दा वाचल्याचे आठवते. सर्वसाधारण व्यक्तीमत्वावर असाधारण अभिनयशैलीने मात केल्याची अशी इतर उत्तम उदाहरणे फार कमी सापडतील. वाचिक अभिनय हा प्रभावळकरांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक विशेष. आवाजाची पट्टी, संवादांची फेक वा प्रोजेक्शन, भूमिकेच्या गरजेनुसार खर्जातल्या आवाजापासून ते थेट संयत-संयमित नि:शब्द पॉजपर्यंत केलेली व्हेरिएशन्स्, शब्दांना-संवादांना दिलेलं महत्त्व, संवादांची सांभाळलेली लय, अचूक शब्दोच्चार, उत्तम टायमिंग – या सर्वांचा त्यांच्या आजवरच्या भूमिका परिणामकारक व्हायला मदत झाली आहे.
अभिनयाच्या व साहित्याच्याही क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय पारितोषिक, पु.ल. बहुरुपी सन्मान, विष्णुदास भावे गौरव पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, चिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कार, कित्येक महाराष्ट्र राज्य पुरस्कार व नाट्यदर्पण मानचिन्हे, मटा सन्मान असे अगणित मानाचे पुरस्कार-सन्मान-किताब मिळवून सुध्दा हा ज्येष्ठ व चतुरस्त्र नाट्यधर्मी चाळीस वर्षांच्या अखंड व प्रदीर्घ रंगसेवेनंतर आजही नवनव्या भूमिका पूर्वी इतक्याच जोमाने करताना व त्यातील नवनवीन बारकावे तितक्याच उत्साहाने शोधताना आढळतो.
कित्येक नाटक-मालिका-चित्रपटांत उत्तम अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणार्या या मराठी रंगभूमी-चित्रसृष्टीच्या अनभिषिक्त सम्राटाला तमाम प्रेक्षकवर्गातर्फे सलाम! आजच्या या मुखवट्यांच्या जगात एक हाडाचा सच्चा कलावंत म्हणूनच नव्हे तर एक दिलाचा सच्चा माणूस म्हणून देखील मराठी मनाशी नातं जोडणारा हा दिलीप आता फक्त प्रभावळकरांचा राहिला नसून अवघ्या महाराष्ट्राचा – वा महाराष्ट्रीयांचा – झाला आहे असे कोणी म्हणाल्यास वावगे ठरु नये.
अशा या बहुआयामी अवलियाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!