भोपाळ | झुंज न्यूज : एक्स गर्लफ्रेण्डने फोन उचलणं बंद केल्याच्या रागातून विवाहित तरुणाने तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लग्नानंतरही तरुणाला आपल्या आधीच्या प्रेयसीसोबत मैत्री कायम ठेवायची होती, मात्र तिने संबंध तोडल्याने तरुणाचा संताप झाला. अखेर त्याने गळा चिरुन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशात ही घटना घडली.
नेमकं काय घडलं ?
23 वर्षीय आरोपी सुमितचे संबंधित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र नुकताच त्याने दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह केला. त्यानंतर एक्स गर्लफ्रेण्डने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. सुमितला आपल्या लग्नानंतरही तिच्यासोबत मैत्री कायम ठेवायची होती, मात्र ती फोनही उचलत नसल्यामुळे तो बेचैन झाला होता. अखेर त्याने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डला ठार मारण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
दिवसाढवळ्या सुमितने तिच्या घराजवळ जाऊन तिचा गळा सुरीने चिरला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी जखमी तरुणीला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिचा जीव वाचला. पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन भागातून सुमितला अटक केली. त्याने वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.
महाकाल मंदिरातून अटक
पीडितेने जबाबात सुमितने आपल्यावर हल्ला केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करुन पोलिसांनी सुमितला बेड्या ठोकल्या. उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात पोलिसांनी त्याची धरपकड केली. आपण फोन करुनही तिने भेटीस नकार दिल्यामुळे हत्येचा प्रयत्न केला, असं त्याने पोलिसांना सांगितलं.