मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजार थांबणार ; किमतीच्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या मास्क आणि सॅनिटायजर आवश्यक बनले आहे. ही गरज ओळखून यावरही नफेखोरी मिळविण्यासाठी या मास्क आणि सॅनिटायजरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता आलेले नाही. परिणामी मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजार वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे एक समिती गठीत केली.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कोरोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे. या दोन्ही वस्तू नियंत्रित दराने मिळण्यासाठी तसेच त्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना मास्क आणि सॅनिटायजरच्या कमाल दर मर्यादा ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *