नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही , दररोज १५ लाख लसीकरणाची शासनाची तयारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई I झुंज न्यूज : तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे ,जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे, महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

पुढच्यास ठेच , मागचा शहाणा

मुख्यमंत्री म्हणाले की,कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल.

पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दररोज १५ लाख लसी देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले
प्रारंभी महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले.

मालाडच्या कोविड जम्बो कोविड सेंटर व इतर माहिती

• या तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोविड सेंटर्समधील बेडची संख्या वाढवण्यासोबतच चार नवीन कोविड सेंटरही सुरु करणार.

• त्यापैकीच एक म्हणजे मालाड जम्बो कोविड सेंटर होय. या सेंटरमध्ये २१७० बेडस् आहेत. त्यात जवळपास ७० टक्के म्हणजे १,५३६ ऑक्सिजन बेड तर १९० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी २०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि ५० पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.

• मालाड जम्बोसह दुसऱया टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर देखील आपण सुरु करत आहोत. तर नेस्को, रिचर्डसन ऍण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआय मधील बेडची संख्या वाढवली जात आहे.

• जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे ८,३२० इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात ७० टक्के म्हणजे ५, ९८६ ऑक्सिजन बेड तर १,१४० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे ६०० ऑक्सिजन व १५० आयसीयू बेड आहेत.

• पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता १५ हजार ६२७ होते आहे. त्यात ९,१९३ ऑक्सिजन बेड, १,५७२ आयसीयू बेड आहेत.

• यामध्ये लहान मुलांसाठी एकूण १,२०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि १५० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.

• जम्बो सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये आपण ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि पेडियाट्रिक बेडची संख्या अधिकाधिक असेल, यावर भर दिला आहे.

• जम्बो सेंटर्सच्या संख्येमध्ये जर आपण महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केली तर आता एकूण बेडसची संख्या ही १९ हजार ९२८ म्हणजे जवळपास २० हजार इतकी होते आहे. 

• पहिल्या व दुसऱया लाटेमध्ये मिळून आतापर्यंत सुमारे ७७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार 

• जम्बो कोविड सेंटर्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीकेसी कोविड सेंटर, गोरेगाव नेस्को कोविड सेंटर, वरळी एनएससीआय संकूल, मुलूंड रिचर्डसन ऍण्ड क्रूडास, भायखळा रिचर्डसन ऍण्ड क्रूडास आणि दहिसर जम्बो कोविड सेंटर असे प्रमुख सहा कोविड सेंटर सुरु.

• या ६ जम्बो कोविड सेंटर्समध्ये मिळून ७ हजार ३०७ बेडस् आहेत. ज्यात ३ हजार २०७ ऑक्सिजन बेड तर ४३२ आयसीयू बेड आहेत. सोबत लहान मुलांसाठी ६०० बेडदेखील आहेत.

• संभाव्य तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांना देखील कोविडची बाधा होवू शकते, हे लक्षात घेऊन लहान मुलांसह नवजात बाळांसाठी स्वतंत्र व जास्तीत जास्त बेड उपलब्ध करणे आवश्यक आहे.

• यामध्ये जवळपास ११ हजार बेड हे ऑक्सिजन सह तर २,३४८ आयसीयू आहेत.

• सोबतच, लहान मुलांसाठी १,५०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि २३० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. नवजात बाळांसाठी ६० बेडदेखील यामध्ये बनविण्यात आले आहेत.

• कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत (दि.२७ जून २०२१) मुंबईत एकूण ७ लाख २० हजार ३५६ बाधित रुग्ण आढळले. यापैकी ६ लाख ९४ हजार ०८२ (९६.३५ टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

• इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यासाठी नियमित रुग्णालयांसोबतच जम्बो कोविड सेंटर्सनीदेखील खऱया अर्थाने मोलाचा हातभार लावला आहे.

• मुंबईत जवळपास २० हजारावर कोविड बेड उपलब्ध आहेत. म्हणजेच बाधितांवर उपचारांसाठी पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *