प्रभाग क्र. २३ मध्ये वासुदेव करतायेत लसीकरण व कोरोनाविषयी जनजागर ! ; नगरसेवक अभिषेक बारणे व नगरसेविका अर्चना बारणे यांचा आगळा वेगळा उपक्रम

थेरगाव I झुंज न्यूज : संत संस्कृतीची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात वासुदेवचे महत्त्व असाधारण. गावागावात पहाटे घरोघर जाऊन अभंग-गवळणी गात दान मागणारा हा लोककलाकार. याच वासुदेवाने शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरीचे काम केले. आता तोच वासुदेव कृष्णभक्तीचे गोडवे गात, सामाजिक भान जपत थेरगाव प्रभाग क्र २३ मध्ये लसीकरण व करोना संसर्गाविषयी जनजागृती करीत आहे.

नगरसेवक अभिषेक बारणे व नगरसेविका अर्चना बारणे यांच्या संकल्पनेतून लसीकरण व कोरोना विषयी जनजागृती करण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे.

डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे आणि सोबतच अंगावर कोरोना जनजागृती पोस्टर अशी वेशभूषा आणि मुखी मंजुळ वाणी यामुळे वासुदेव सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रभाग क्र २३ मध्ये वासुदेव सध्या रोज सकाळी गल्लोगल्ली फिरून करोनाविषयी जनजागृती करीत आहेत. आपल्या मंजुळ वाणीतुन गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, गरज असेल तरच घराबाहेर पडा. प्रवासाचा धोका पत्करू नका. एकाच ठिकाणी जास्त माणसे दिसली तर घोळक्याने उभे राहू नका. वेळोवेळी हात धुवा, मास्क लावा अशा प्रकारचे समाज प्रबोधन वासुदेव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *