उस्मानाबाद I झुंज न्यूज : उस्मानाबाद शहरातील एका ३२ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी या महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने वेळोवेळी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले होते.
या कर्मचाऱ्याचा त्रासाला वैतागूनच महिलेने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीवरून निष्पन्न झाल्याचे समजते. त्यामुळे मयत महिलेच्या पतीने रात्री उशिरा याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचा-याविरोधात ठाण्यात तक्रार दिली.
संबंधित पोलिसाने सप्टेंबर २०२० पासून वेळोवेळी धाक दाखवून अत्याचार केल्यानेच पत्नीने आत्महत्या केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.