महापालिकेतील भ्रष्टाचार वाढल्यामुळे नागरिकांनी भरलेल्या कराची लूट ! ; प्रहार पक्षाचे अजिंक्य बारणे यांचा आरोप

मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा तीव्र इशारा

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड मनपा येथील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी व विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अजिंक्य दिलीप बारणे, युवा जिल्हा उपाध्यक्ष वैभव भरत भोसले, प्रवीण प्रकाश मोरे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष संतोष आप्पा साठे, पुणे शहर युवा कार्याध्यक्ष प्रेमराज पवार व पुरंदर तालुका युवा अध्यक्ष आकाश सणस, आणि प्रहारचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पालिकेतील भ्रष्टाचार वाढल्यामुळे नागरिकांनी भरलेल्या कराचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मनपाची वित्तीय लूट देखील होत आहे असा आरोप या निवेदनातून प्रहारचे जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष अजिंक्य दिलीप बारणे यांनी केले आहे. यासोबतच अनेक मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या ?

१. कोरोना योद्धा म्हणून मृत्युमुखी पडलेल्या पिं.चिं.मनपा कामगारांच्या वारसांना तात्काळ सानुग्रह अनुदान धनादेश मिळावा.

२. मनपातील लेखपरिक्षणातील रेकॉर्ड नसलेले ३८६६ कोटी २७ हजार १२५ रुपयांचा हिशोब तातडीने प्रसिद्ध करण्यात यावा व रेकॉर्ड गायब करण्याचा आरोप असलेल्या मनपा अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करावा.

३. पिंपरी चिंचवड शहर मध्ये स्वतंत्र पत्रकार भवन उभारणीसाठी मंजुरी देण्यात यावी व निधी उपलब्ध करून द्यावा.

४. BRT सेवा पूर्णपणे सुरळीत सुरू करण्यात यावी व सक्तीने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी.

जर या मागण्यांवर १० दिवसात काही कार्यवाही करण्यात आली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे असा तीव्र इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *