लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करावा ; मुख्यमंत्र्यांकडून सरोवराची पाहणी

बुलडाणा I झुंज न्यूज : लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे. त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

श्री. ठाकरे यांनी आज लोणार सरोवर येथील वनकुटी व्ह्यू पॉईंटला भेट दिली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली.

लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार एकत्रितरीत्या करावा. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी.

लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *