धुळे ग्रामपंचायत निवडणुकीत “सख्या जाऊबाई” आमने सामने ! ; जावांमधील रस्सीखेच सध्या चर्चेचा विषय

धुळे I झुंज न्यूज : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात २८ गावांपैकी दहिवद आणि मांडळ येथे दोन जावा एकमेकांविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या आहेत. मोठी जाऊ विरुद्ध लहान जाऊ अशी लढत इथे पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणती जाऊ विजयी होते, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, या जावांमधील रस्सीखेच सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा अन्य कोणत्याही स्वराज्य संस्थेची निवडणूक असो. अशा निवडणुकीत दरवेळी आपले नशीब आजमावण्यासाठी आणि निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेल्या राजकारणी भाऊबंदकीतील व्यक्ती यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत आहेत. ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत अजून बाकी असल्याने नात्यातील व्यक्ती यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

शिरपूर तालुक्यातील मंडळ येथे प्रभाग क्रमांक १ ब मधून मोहिनी दिनेश माळी या लहान जावेविरोधात जयश्री गोपाल माळी ही मोठी जाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहे. दहिवद येथे माजी सरपंच जगन्नाथ भिला पाटील यांची सून वृषाली चुनीलाल पाटील या लहान जावेविरोधात माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांची पत्नी या नात्याने मोठी जाऊ असलेल्या आशाबाई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे १८ तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतर कोणती जाऊ सरपंच पदी विराजमान होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय एकूण १४,२३४ संख्या

ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२.

१४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *