राष्ट्रवादीत आता नित्यनियमाने इनकमिंग सुरु ; तौफिक शेख यांच्यासह १० नगरसेवकांचा एमआयएम पक्षाला अलविदा

सोलापूर I झुंज न्यूज : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत आता नित्यनियमाने इनकमिंग सुरु आहेत. यामध्ये आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांची भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापुरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

सोलापूर महानगरपालिकेतील दहा पैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून थेट शून्य होणार आहे.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आवर्जुन तौफिक शेख यांची भेट घेतली होती. यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले होते की, कुछ दिनों बाद तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा. आप जैसे तय करेंगे वैसे होगा.

“तौफिक शेख यांनी २०१४ मध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. यात प्रणिती शिंदे आणि तौफीक शेख यांच्यात चुरशीची लढत झाली होती. सोलापूर शहर मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. परिणामी तौफिक शेख यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *