अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन ; चित्रपटसृष्टीने एक भारदस्त व्यक्तिमत्व गमावले

पुणे| झुंज न्यूज : मराठी रंगभूमीसह, आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. पटवर्धन यांना मार्च महिन्यात देखील हृदयविकाराचा झटका आला होता.

एक क्षण : ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन यांच्यासमवेत “झुंज न्यूज” चे संपादक अनिल वडघुलेे.

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी गाजवल्यानंतर रवी पटवर्धन यांनी छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला. त्यांच्या झुपकेदार मिशा आणि जरब बसवणारा आवाज हा त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला अगदी साजेसा होता. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांनी गावचा पाटील, पोलिस आयुक्त आणि न्यायाधीस अशाबरोबर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या. पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी २०० हून अधिक चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे सन १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी यांच्यासोबत आरण्यक या नाटकात पहिल्यांदा काम केले. त्यानंतर वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी या नाटकात धृतराष्ट्राचीच भूमिका साकारली. तर शिवपुत्र शंभूराजे या महानाट्यात गेले अनेक वर्ष ते औरंगजेबाची भूमिका साकारत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *