पिंपरी | झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातून पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ७५ हजारांची चार पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. रूपेश उर्फ संतोष सुरेश पाटील, वय- ३८ रा. भोसरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
आरोपी रुपेशवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म ऍक्ट असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील मैदानात आरोपी रुपेश हा पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी गणेश सावंत आणि सुमित देवकर यांना मिळाली होती.
याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी परिसरातील पांजरपोळ याठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी रुपेशची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तुल, पिशवीत तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळली आहेत. त्यानुसार रुपेश याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.