पुणे | झुंज न्यूज : राज्यात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना एका बाजूला कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. दिवाळीत असंख्य नागरिक घराबाहेर पडले होते. यामुळे दिवाळीनंतर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी तपासणी झालेल्यांमध्ये साधारणत: १४ टक्के व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात २ हजार ७४३ जणांची कोरोना चाचणी केली असता यापैकी ३८४ जण पॉझिटिव्ह आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. १० टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता १३ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे.
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ७३ हजार ७८९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६५ हजार ४२६ जण पॉझिटिव्ह तर १ लाख ५६ हजार ६३९ जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ४ हजार ४०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.