बीडमधील मस्साजोगच्‍या सरपंच हत्‍येप्रकरणी दोषींना फाशी द्या…

मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन

पिंपरी I झुंज न्यूज : बीड जिल्‍ह्याच्‍या केज तालुक्‍यातील मस्‍साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्‍या हत्‍येमध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने करण्यात आली आहे. तसेच हा खटला जलद गती न्‍यायालयात (फास्‍ट ट्रॅक कोर्ट) चालवावा अशीही मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्‍ह्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांना दिलेल्‍या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्‍वयक सतीश काळे गणेश देवराम गणेश कुंजीर नकुल भोईर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने दिलेल्‍या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,संतोष देशमुख यांच्याकडे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावची उपसरपंचकी आणि सरपंचकी होती. सुरुवातीच्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी मस्साजोगच्या सरपंच झाल्या होत्या मात्र त्यानंतर ते स्वत: देखील सरपंच झाले. यावरुन त्यांची गावच्या राजकारणावर असलेली पकड समजते त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुलगा व मुलगी नातेवाईक आहेत.

नुकतीच सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यांना अत्यंत विदारक पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचे व्हायरल झालेल्या फोटोवरून स्पष्ट होत आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात काही जणांविरोधात गुन्हा दाखल असून काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काही जण फरार असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेमध्ये संबधित असणाऱ्या सर्वांची कसून चौकशी करून सर्व आरोपींना अटक करावी हा खटला जलद गती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा. तसेच बीड जिल्ह्यात बिहार सारखी गुन्हेगारी प्रवृत्तीने वाटचाल सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे या मागणीबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या घटनेचा महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *