शहरात चांगल्या शिक्षण संस्था आणण्यासाठी पालकांना केले आश्वस्थ
महापालिका शाळांचा दर्जा सुधारणार, शिक्षण संस्था अद्यावत करणार
भोसरी I झुंज न्यूज : महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे गुरुवारी इंद्रायणीनगर परिसरात चिमुकल्यांमध्ये रमले. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत असताना काही चिमुकल्यांनी अजित गव्हाणे यांचे लक्ष वेधले. या मुलांशी गप्पा मारत त्यांच्या पालकांना आगामी काळात महापालिका शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच येथील शिक्षण संस्था अद्यावत करण्यावर भर देणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बालाजी नगर इंद्रायणी नगर तसेच आसपासच्या परिसरामध्ये प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अजित गव्हाणे यांनी गुरुवारी इंद्रायणी नगर परिसरातील समर्थ कॉलनी, सिद्धिविनायक नगरी, आनंदसागर, कृष्णा हेरिटेज, संजीवनी कॉलनी द्वारका विश्व, राजेश्वर सोसायटी, केंद्रीय विहार, महाराष्ट्र चौक, गंगा निकेतन सोसायटी, स्पाइन मॉल, सेक्टर नंबर 9, सेक्टर नंबर 11 या भागांमध्ये अजित गव्हाणे यांनी गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधला.
दरम्यान गुरुवारी सायंकाळी बालदिनाचे औचित्य साधत अजित गव्हाणे चिमुकल्यांमध्ये रमलेले दिसले. त्यांनी निवडणुकीच्या धामधुमीतही मुलांशी गप्पा मारल्या. यावेळी या मुलांच्या पालकांशी चर्चा करत महापालिका शाळांचा दर्जा सुधारणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. आगामी काळात या शहरांमध्ये नामांकित शिक्षण संस्था येतील. त्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल असे देखील अजित गव्हाणे म्हणाले.