– दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या निवासस्थानी दिली भेट
– स्थायी समिती माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या कुटुंबियांशी चर्चा; जुन्या आठवणींना दिला उजाळा
सांगवी । झुंज न्यूज : पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील महत्वाचे स्थान असलेल्या दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद यांनी गुरुवारी (ता. १४) सांत्वन भेट घेतली.
शरद पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनचे त्यांचे घनिष्ठ मित्र व सहकारी असलेल्या नानासाहेब शितोळे यांच्या पत्नीचे गेल्या महिन्यात २२ ऑक्टोंबर रोजी अनिता उर्फ नानी नानासाहेब शितोळे यांची निधन झाले होेते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीतही पवार यांनी जुने ऋनाणुबंध जपत शितोळे कुटुंबियांच्या घरी भेट देवून सांत्वन केले. यावेळी नानासाहेब यांचे चिरंजीव अजय शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मुलगी आरती राव, सुना व नातवंडे यांच्यासह राहुल कलाटे देखील उपस्थित होते.
पवार यांनी नानींच्या आजारपणाबद्दल चौकशी केली. नानासाहेबांच्या लग्नाला मी धुळे जिल्ह्यात साक्रीला गेलो होतो, याची आठवणही त्यांनी सांगितली. नानासाहेब कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व पक्षनेते असताना याच निवासस्थानात नगरसेवक पदासाठी मुलाखती, अनेक बैठका झालेल्या होत्या. त्यामुळे शरद पवार यांनी घरात झालेल्या फेरबदलाबाबतही भाष्य केले. नानासाहेबांचा कसब्यातही वाडा होता. त्यामुळे ‘कसब्यात आता कोण राहते?’ असेही पवार यांनी विचारले. तसेच; मुला-मुलांची व नातवंडाची चौकशी केली.
पवार यांच्या पहिल्या प्रचारात वापरलेल्या ‘जावा’गाडीची चौकशी
नानासाहेब शितोळे यांनी शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीत प्रचारासाठी ‘जावा’ मोटारसायकल खरेदी केली होती. या गाडीवर नानासाहेबांबरोबर शरद पवार, माजी मंत्री रामराजे निबांळकर आदि नेते फिरले होते. ‘मी फिरलेलो ती मोटारसायकल आहे का?’ असे साहेबांनी विचारले. त्यावेळी शितोळे कुटुंबियांनी ‘ॲंटीक पिस’ म्हणून ती बंगल्याच्या बाहेर ठेवली असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी जाताना त्या मोटारसायकलचीही पाहणी केली. जाताना अजय शितोळे यांना गाडीत घेवून शरद पवार पुढील प्रचाराच्या रॅलीसाठी रवाना झाले.