नारीशक्तीला वंदनीय मानणाऱ्या महेश लांडगे यांना साथ द्या !

– विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांचे आवाहन
– महाविकास आघाडीचे धोरण महिला विरोधी – चित्रा वाघ

भोसरी I झुंज न्यूज : महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नारी ही वंदनीय आहे. हा विश्वास देणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.

तसेच, भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे याच तत्वावर काम करत असून स्त्री शक्तीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या , महिलांना सशक्त व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महेश लांडगे यांच्या हॅट्रिक साठी महिला शक्तीने पुढे यायचे आहे असे आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केले.

महायुतीचे भोसरी विधानसभेतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ महिला निर्धार मेळाव्याचे भोसरी इंद्रायणी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा, महिला आघाडी तसेच विविध मंडल मधील प्रमुख पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

चित्र वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे धोरण हे महिला विरोधी आहे. महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खूपत आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक सक्षम केले असून छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक महिला महायुती बरोबर जोडल्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीला महिलांचा हाच पाठिंबा खूपत आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे.

“भोसरी विधानसभेतील महेश लांडगे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते. त्यांचे काम मी अगदी जवळून पाहिले आहे. भाजपने नारीवंदन विधेयक आणले. मात्र महेश लांडगे यांनी नारीशक्तीला बळकटी देण्याचे काम केले आहे. इंद्रायणी थडी सारखा उपक्रम दरवर्षी ते राबवतात. या माध्यमातून लाखो महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. लाखो महिला या माध्यमातून भाजपाशी जोडल्या गेल्या. हे महेश लांडगे यांचे दहा वर्षातील कामाचे फलित आहे.
– चित्रा वाघ, आमदार, विधान परिषद.

महेश लांडगे यांची ‘हॅट्रिक’ करायची : चित्रा वाघ
भोसरी मतदारसंघातील सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला महेश लांडगे यांना डोळे झाकून मतदान करतील यात कुठलीही शंका नाही. कारण ज्या ज्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळी महेश लांडगे त्या ठिकाणी उभे ठाकलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे मी शब्द देते या मतदारसंघात महिलांच्या सुरक्षेचा कोणताही मुद्दा उपस्थित होणार नाही यासाठी आपल्याला महेश लांडगे यांना निवडून आणायचे आहे. त्यांची हॅट्रिक महिला शक्तीच्या माध्यमातून फिक्स करायची आहे, असे आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *