महाविकास आघाडीच्या नेत्यांचे महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पिंपरी I झुंज न्यूज : भोसरी येथील अर्बन स्ट्रीट च्या बांधकाम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका 45 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. सदरातील घटना हि जुलै महिन्यात घडली आहे. त्यामुळे करता पुरुष गेल्याने या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने या कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने व महापालिकेकडून पूर्णपणे ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट महानगरपालिकेमधील चौथ्या मजल्यावर प्रवेश करत आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आयुक्त शेखर सिंह कार्यालयात नसल्याने अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना निवेदन स्वीकारून चर्चा करण्यासाठी बाहेर बोलवले असता बाहेर येण्यास नकार दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोपर्यंत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्हीही त्यांच्या कॅबिनमध्ये जाणार नाही असा पवित्र घेतल्याने परिस्थिती आणखीनच स्फोटक होत गेली.
त्यामुळे अखेर जांभळे पाटील यांनी बाहेर येऊन सर्वांना आत मध्ये येण्याची विनंती करून चर्चेला सुरुवात केली. यावेळी मृत तरुणाच्या कुटुंबातील व्यक्तीला महानगरपालिकेच्या सेवेमध्ये घ्यावे व महानगरपालिकेने या कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक अजित गव्हाणे, शिवसेना युवा नेते रवी लांडगे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह अनेक सहकारी व मृत कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.