६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
भिगवण I झुंज न्यूज : वनखात्याच्या जमीनीवर मुरुम का टाकला ? असे म्हणुन गुन्हा दाखल करतो? अशी बतावणी करून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ६ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण येथील वनविभागाच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल भक्ती शक्ती प्युअर व्हेज जवळ केली आहे.
उल्हास दत्तात्रय मोरे (वय ३२, भिगवण सर्कल कार्यालय, इंदापूर वनविभाग, ता. इंदापुर, जि. पुणे. (वर्ग-३) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रहात असलेल्या घरासाठी पुर्वीपासूनच वनविभागाच्या जागेतून रस्ता वापरत होते. नजीकच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे सदर रस्त्यावर खड्डे व चिखल झाला. त्यामुळे तक्रारदार यांनी स्वखर्चाने सदर रस्त्यावर मुरूम टाकला.
दरम्यान, आरोपी लोकसेवक उल्हास मोरे यांनी सदर वनखात्याच्या जमीनीवर मुरुम का टाकला ? म्हणुन गुन्हा दाखल करतो? असे सांगितले. त्यानंतर आरोपी ज्ञानदेव बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक उल्हास मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील कामासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले. तसेच तडजोडीअंती ६ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. लोकसेवक उल्हास मोरे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.