चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, अन्यथा पक्षातून बाहेर पडू !

माजी नगरसेवकांचा थेट अजितदादांनाच इशारा

चिंचवड I झुंज न्यूज : लोकसभेला अजित पवार गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने घवघवीत य़श मिळवल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंग सुर झाले आहे. तर, काहींची घरवापसीही होत आहे. पिंपरी-चिंचवड त्याला अपवाद नाही. शहरातील अजित पवार गटाचे बहूतांश माजी नगरसेवक तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. त्यातील चौघांनी बुधवारी (ता.२५) पत्रकारपरिषद घेऊन बंडाचे निशाणच फडकावले.

चिंचवडमधील माजी नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, विनोद नढे यांनी आज प्रेस घेऊन थेट अजितदादांनाच आव्हानाची भाषा केली. भाजपकडे असलेली चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे घेऊन तेथे नवीन चेहरा (म्हणजे त्यांच्यातील) उमेदवार दिला नाही, तर वेगळा विचार केला जाईल, असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकला. अजितदादांनी आमची मागणी मान्य केली नाही, तर बाहेर पडू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. 

महाविकास आघाडीचा पर्याय असल्याचे सांगत शरद पवार राष्ट्रवादीत जाण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. याव्दारे त्यांनी नाना काटे आणि राहूल कलाटे यांच्या युतीकडील संभाव्य उमेदवारीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला. दुसरीकडे त्यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार जगताप कुटुंबातील व्यक्तीच्या वाटेतही काटे पसरवले.

उद्योगनगरीत पिंपरीमध्ये अजितदादा गटाचे आमदार (अण्णा बनसोडे) आहेत. मात्र,त्या जागेवर नुकताच भाजपने दावा ठोकला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीने पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड अशा तिन्ही जागांवर लगेच क्लेम केला. त्यामुळे शहरात युतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसले. त्यानंतर आता शहरातील चिंचवड मतदारसंघातील युतीतील राष्ट्रवादीतीच्याच एका गटाने या जागेवर आज दावा केला. ही जागा अजितदादांनी स्वताच्या पक्षाकडे घेऊन तेथे उमेदवार म्हणून नवा चेहरा (म्हणजे या गटातील) देण्याची मागणी केली. नाही, तर आघाडीत (शरद पवार राष्ट्रवादी ) जाऊ,असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यातून शहरात २०१७ पर्यंत तीन टर्म निर्वीवाद सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीतही ऑल इज नॉट वेल, असेच म्हणता येईल.

अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच आपल्या समर्थकांसह घरवापसी केली. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शहरातील बहूतांश पक्ष हा अजित पवारांसबरोबर गेला होता. मात्र, आता तो पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता अध्यक्ष गव्हाणेनंतर चिंचवड मतदारसंघातील अजितदादांच्या दहा माजी नगरसेवकांचा गट घरवापसीच्या तयारीत आहेत. तसं झालं, तर या अजित पवार गटाला मोठे खिंडार पडणार आहे. त्याचा मोठा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत या पक्षाला आणि पर्यायाने युतीला बसू शकतो. आगामी महापालिका निवडणुकीतही त्याचे धक्के जाणवतील. या मोठ्या आणि मजबूत गटाचा पावित्रा शेवटपर्यंत कायम राहिला, तर चिंचवडच नाही, तर शहरातील राजकीय समीकरणही बदलेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *