सलाम ! पत्रकार प्रसाद गोसावी यांचं मृत्यूनंतरही हृदय धडधडतंय…

अवयवदान केल्याने लष्करी जवानासह ५ जणांना नवसंजीवनी

पुणे । झुंज न्यूज : पुण्यातील एका न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गोसावी यांना ब्रेनडेड घोषित केल्यावर त्यांचे अवयवदान करण्यात आले. गोसावी कुटुंबीयांच्या या निर्णयामुळं पाच जणांना जीवदान मिळालं आहे.

प्रसाद गोसावी यांचे रविवार (दि. १) निधन झाले. दोन महिन्यापूर्वी त्यांचा आपघट झाला होता. त्यांच्यावर निगडीच्या एका दवाखान्यात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सुधारत असतांना, त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्यात यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेनुसार त्यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. त्यांच्या या इच्छेमुळे एका लष्करी जवानाला त्यांचे हृदय यशस्वी रित्या प्रत्यारोपित करण्यात आले आहे. प्रसादची मृत्युसोबतची झुंज अपयशी ठरली असली तरीही त्याचे हृदय आजही धडधडत आहे. प्रसादच्या हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे, यकृत, व एक मूत्रपिंड व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. असून त्याने एकूण पाच रुग्णांना जीवनदान दिले आहे. असा करणारा प्रसाद हा पहिला पत्रकार ठरला आहे.

प्रसाद गोसावी यांचा दोन महिन्यांपूर्वी दुचाकीवरून जात असतांना गंभीर अपघात झाला होता. ही घटना खडकी रेल्वे स्थानका जवळ घडली होती. प्रसाद यांना तातडीने निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासूनची त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अपघातात त्यांच्या मेंदूला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरु असताना त्यांच्या पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे दुर्दैवाने त्याचा उजवा पाय पोटरीपासून काढण्यात आला.

त्यानंतर त्याची प्रकृती सुधारत होती. मात्र, अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी प्रसादला ब्रेनडेड घोषित केले. या बातमीमुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, असे असतांना प्रसाद यांची अवयव दानाची इच्छा त्यांनी पूर्ण केली. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, यकृत, व एक किडनी हे अवयव काढून त्यांना गरजू रुग्णांना दान करण्यात आले.

लष्करी जवानाला दिले हृदय
“प्रसादचे हृदय हे एका लष्करी जवानाला प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. डी वाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व व कर्मचाऱ्यांनी प्रसादच्या या कार्याला सलामी दिली. त्याचे हृदय हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *