नाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण
नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची घोषणा
पिंपरी I झुंज न्यूज : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नाट्य- चित्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदापासून नाट्य चित्रक्षेत्रातील सन्माननीय जेष्ठ कलावंताला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य- चित्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्याचे निश्चित झाले आहे.
येत्या ९ ऑगस्टला संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथिल प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटनेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.पुरस्कार सोहळ्यानंतर अजित भुरे हे रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
याबरोबरच प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशा रुपा परभणीकर व नाट्यकर्मी नटराज जगताप यांच्यासह अजून काही सन्माननीय कलावंतांना, त्यांच्या आजवरच्या कार्यासाठी गौरविण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरामधून विधानपरिषदेवर नुकतीच नियुक्ती झालेले कलाप्रेमी श्री अमित गोरखे यांचा विशेष सत्कार होणार आहे.
रोहिणी जयदेव हट्टंगडी या अशा एकमेव भारतीय कलाकार आहेत, की ज्यांना BFTA अर्थात ब्रिटिश फिल्म अकॅडमी अवॉर्ड प्राप्त झाले आहे. त्यांना हे पारितोषिक सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून रिचर्ड ॲटनबरो निर्मित ‘ गांधी ‘या चित्रपटातील कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी मिळाले आहे.
“मूळच्या पुण्याच्या असलेल्या रोहिणी ताई यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे प्रवेश घेतला होता. त्या कथकली आणि भरतनाट्यम ही शिकल्या. त्यांनी (जयदेव हट्टंगडी) पतीबरोबर सुरू केलेल्या ‘ आशीर्वाद ‘ संस्थेद्वारे दीडशे नाटकांची निर्मिती व अनेक नाटकात अभिनय केला.त्यांचे चित्रपटातील पदार्पण , १९७८ साली सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘ अरविंद देसाई की अजिब दास्तान ‘ या चित्रपटात द्वारे झाले. त्यांना दोन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड आणि एकदा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्राबरोबरच रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक मालिकांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय हिंदी, तेलगु, मल्याळम,कन्नड, गुजराथी या भाषेतील चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. मसारांश ,अर्थ, प्रतिघात ,आघात, मोहन जोशी हाजीर हो, मुन्नाभाई एमबीबीएस, घातक, दामिनी हे त्यांचे हिंदी भाषेतील गाजलेले चित्रपट आहेत.