पिंपरी गावात भटक्या कुत्र्यांची दहशत ; नागरिकांना चालणे झाले जिकिरीचे

…अन्यथा कुत्री महानगरपालिका भवनासमोर सोडणार – सुहास कुदळे

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी गाव कुदळे कॉलनी परिसर,महात्मा फुले कॉलेज समोरील मुख्य रस्ता परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना जिकरीचे वाटू लागले असून, कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे व परिसरातील नागरिक करत आहेत.

कुदळे कॉलनी परिसर भागात महिला,ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांची दहशत आहे. अनेकदा झुंडीने फिरणारी ही कुत्री अचानक पादचारी, दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे एखादी दुर्घटना, अपघात घडण्याची शक्यता निर्माण होते.

परिसरातील अनेक नागरिक रात्रीच्या वेळी कामावरून परतत असतात. त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शिळे, उरलेले अन्न रस्त्यावरच ,परिसरात उघड्यावर पदार्थ टाकल्याने भटकी कुत्री अन्नाच्या शोधात या परिसरात जमलेली पाहायला मिळतात .परिसरातील काही चायनीज व हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर शिळे, उरलेले अन्न टाकत असल्याने कुत्र्यांची झुंडी येथे फिरत असतात. असे नागरिक सांगतात.

कुत्री अंगावर येत असल्याने वाहनचालकांचा गडबडून अपघातही होतो. भटक्या कुत्र्यांना पकडुन नेण्यासाठी स्थानिक नागरिक महापालिकेकडे तक्रारही करतात परंतु बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास सुहास कुदळे व स्थानिक नागरिक यांच्या सगळ्यांच्या मदतीने भटकी कुत्री पकडुन ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन मुख्य ईमारत इथे सोडण्याचा इशारा सुहास कुदळे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *