पुणे : खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार केलं. याच श्रेय फक्त खेड तालुक्याला आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे, अशी भावनिक साद शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घातली आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तीनदा खासदार झालो. मला या मतदारसंघात वीस वर्षे काम करताना तुम्ही पाहिले आहे. माझी ही शेवटची निवडणूक आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या.
मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी असे पाच पक्ष फिरून झाल्यावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे दार ठोठावणारे तुम्ही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीला हजर राहून आम्हाला मिठ्या मारणारेही तुम्हीच, अशी टीका दिलीप मोहिते पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा नामोल्लेख टाळून केली.
मतदारांनी जीवाचे रान करून निवडून दिले; पण अमोल कोल्हे यांनी त्यांच्याशी प्रतारणा केली. आम्हाला तर साधा चहा पाजला नाही. पाच वर्षे मतदार संघ वाऱ्यावर सोडला मग खरे गद्दार तुम्हीच आहात. करोना काळात चित्रीकरणाच्या नावाखाली मतदारसंघात येण्याचे टाळले.बैलगाडा शर्यती सुरू केल्या म्हणून सांगता; पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली, अशी टीका दिलीप मोहिते पाटील यांनी केली.
दरम्यान, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते हे शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात होते. ते विजयी झाले, त्यावेळी मोहितेंनी भाषणात ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे साद मतदारांना घातली होती. हीच ट्रिक आढळरावांनी वापरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.