मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन व कृतज्ञता सोहळा उत्साहात साजरा… 

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील मराठवाडास्थित नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 2012 मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

          मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरवमधील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्र शासनाने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला, या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व गुढीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ प्रबोधनकार शारदाताई मुंडे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, सुर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, दिलीप बारडकर देशमुख, अभिमन्यू गाडेकर, बळीराम माळी, नितीन चिलवंत, शंकर तांबे, सखाराम वालकोळी, किशोर अट्टरगेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे, बाळासाहेब साळुंखे, प्रकाश इंगोले, आण्णा जोगदंड, मुंजाजी भोजणे, शिवकुमार बायस, राधेश्याम शिंदे, राजशेखर लड्डे, कुलकर्णी काका, राजू शहा, बळीराम कातांगळे, संदिपान सामसे, गोपी पवार, शिवदास हांडे, महादेव पाटेकर, रामेश्वर कोल्हे, जगन्नाथ माने, मदन गायकवाड, रणजीत कनवटे, अनिस पठाण, मालोजी भालके, भैरवनाथ जेष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 


             मराठवाडा जनविकास संघाची स्थापना करण्यामागची भूमिका मांडताना वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, की मराठवाड्यातील जे लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी आपली जन्मभूमी सोडून औद्योगिक नगरीत येतात, त्यांच्या सुख दु:खात सहभागी होता यावे. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, सर्वांच्या सहभागाने मराठवाड्याचा विकास करता यावा आणि आपल्या मराठवाड्याचा जाज्वल्य इतिहास हैदराबाद, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या उपक्रमातून मांडता यावा, या उद्देशाने संस्थेची स्थापना केली.

“गेल्या १२ वर्षात सामाजिक बांधिलकीतून दुष्काळग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा, माळीन दुर्घटनाग्रस्तांना मदत, कोल्हापूर महापूरग्रस्तांना मदत, सोनारीतील वन्य प्राण्यांना फळे, पाण्याची सुविधा, परंडा तालुका मुख्य प्राण्यांची सेवा,  50 हजार झाडांचे वृक्षारोपण, 2015 -16 मध्ये सात टँकरद्वारे 20 गावांना पाणीपुरवठा, वन्य प्राण्यांना पाण्याचीसाठी 105 सिमेंटचे हौद आदी समजोपयोगी कामे करण्यात आली आहेत. तसेच गणेश जयंती, दत्त जयंती, वारकऱ्यांची सेवा, गरज असेल अशा झाडांना बारा महिने टँकरद्वारे मोफत पाणी, एक लाख वृक्षदान वाटप, कोरोना काळात एक हजार गरजूंना दररोज भोजन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर दरम्यान  मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर असे विविध उपक्रम राबविले. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील एक लाख मराठवाडा भूमिपुत्रांची जनगणना करून नोंदणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड, गरजू विद्यार्थ्यांसाठी वस्ती शाळा चालू करुन 500 विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

कुठलीही संघटना चांगले सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते, उपक्रमशील माणसांच्या सहभागातून यशस्वी होत असते. अशा मराठवाडा भूमिपुत्रांचा कृतज्ञता सन्मान पत्र व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला आणि आपल्या सेवाभावी वृत्तीच्या साथीने संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करावी, ही अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *