‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा मावळात शिवसेनेचा प्रचार करणार नाही !’

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा इशारा ; शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण

पिंपरी I झुंज न्यूज : बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत असून त्यांनी अजितदादांची माफी मागावी. अन्यथा आम्ही मावळसह संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा खणखणीत इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला.

खराळवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, फजल शेख, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, ओबीसी निरीक्षक सचिन औटे, प्रदेश सरचिटणीस गोरक्ष लोखंडे, आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेळके, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, उपाध्यक्ष विजय दळवी, सरचिटणीस राजू चांदणे आदी उपस्थित होते.

विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. शिवतारे हे अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. शिवतारे यांच्या विधानामुळे आम्ही नाराज आहोत. कार्यकर्ते संतप्त आहेत. आमच्या नेत्यांबाबत अतिशय चुकीची विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीला तडा जात आहे.

पुढे अजित गव्हाणे म्हणाले की , महायुतीमध्ये राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पार्टी अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली अद्याप आजपर्यंत तरी सहभागी आहोत त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा निवडून येण्यासाठी आम्ही युती धर्म पाळत आहोत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विषयी बेताल वक्तव्य करून युतीधर्म कुठे पाळत आहेत, असा सवाल गव्हाणे यांनी केला. भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी मागणी वर देखील आपण ठाम असल्याचे यावेळी गव्हाणे म्हणाले.

शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली. तर, मावळसह राज्यभरात शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. शिवतारे यांनी अजित पवार यांची माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाहीत. तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत, असा इशारा गव्हाणे यांनी दिला.

शिवतारेंबद्दल कार्यकर्ते संतप्त – नाना काटे
शिवतारे हे सातत्याने आमचे नेते, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत चुकीची, वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. असे नाना काटे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *