पुणे I झुंज न्यूज : जिल्हा सामान्य रुग्णालय, औंध येथील रुग्ण कल्याण समितीच्या स्वीकृत सदस्य पदावर सामाजिक कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे शिलेदार डॉ. देविदास शेलार यांची पुणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने नेमणूक करण्यात आली.
याबाबतचे पत्र जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी डॉ. देविदास शेलार यांना दिले आहे. या नियुक्ती नंतर पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी डॉ. शेलार यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने राज्यातील तसेच परिसरातील गोरगरिब नागरिकांना एकाच छताखाली मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात याकरिता दरवर्षी सांगवी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजित केले जाते, तसेच पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारकऱ्यांकरीता आरोग्यसेवा पुरवण्यात येते, याचे पूर्ण नियोजन डॉ. देविदास शेलार हे करत असतात. याच त्यांच्या सेवकार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून रुग्णांचे हित जोपासण्याचे काम केले जाते. या समितीवर डॉ. देविदास शेलार यांची स्वीकृत सदस्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
आरोग्य संस्थांना येत असलेल्या अडचणी दूर करणे व समित्यामार्फत् रुग्ण सेवा जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण देणे ह्या दृष्टीने जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी “रुग्ण कल्याण समिती” स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिनांक ३० डिसेंबर २००५ व ४ मे २००६ च्या शासन परिपत्रकांन्नवये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
तसेच संदर्भसेवा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, क्षयरोग रुग्णालये, कुष्ठरोग रुग्णालये, मनोरुग्णालये येथे समिती स्थापन केलेल्या आहेत. आरोग्य संस्थामध्ये रुग्ण कल्याण समिती चॅरिटी कमिशनर ऍक्ट नुसार स्थापन झालेल्या आहेत. प्रत्येक रुग्ण कल्याण समिती अंतर्गत नियामक समिती धोरणात्मक निर्णय घेते व कार्यकारी समिती निर्णयाची अंमलबजावणी करण्याची पध्दती ठरविते.
रुग्ण कल्याण समितींतर्गत संस्थानिहाय नियामक व कार्यकारी समिती रचना ठरवून देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे समिती स्थापन करण्यात आल्या असून रुग्ण कल्याण समिती निधी हा त्या समितीचा निधी असल्याने तो खर्च करण्याचा अधिकार हा त्या समितीस असतो. तसेच सदरचा निधी संस्थेच्या गरजेनुसार, रुग्णांच्या कल्याणासाठी, रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी खर्च करण्यात येतो.