“मराठी शब्द वापरून भाषेचा गौरव करा”- अरुण बोऱ्हाडे

चिंचवड I झुंज न्यूज : “आपली मायबोली मराठी ही सर्वांगाने समृद्ध भाषा आहे. आपल्या भाषेतील शब्द आपण दैनंदिन व्यवहारात ठरवून वापरले पाहिजेत. मातृभाषा आणि राजभाषा असणारी मराठी ज्ञानभाषा म्हणूनही श्रेष्ठ आहे. उत्तमोत्तम दर्जेदार शब्दांनी समृद्ध असलेल्या आपल्या मायबोली मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी घराघरात वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज आहे. शहरी भागातील लोकांनां बोली भाषेतील ग्रामीण शब्द वापरायला लाज वाटते. म्हणून इतर भाषेतील शब्द वापरून संभाषण केले जाते. नुसता गौरवदिन साजरा करून उपयोग नाही. पदोपदी मराठी शब्दांचा वापर करणे आणि मराठीमधूनच संवाद साधणे, हाच मराठी भाषेचा खरा गौरव आहे.

\

आपली भाषा हे आपले वैभव असल्याने ते जतन करणे हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, आपल्या बोलण्या वागण्यातून मराठीचा गौरव केला पाहिजे. ” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक आणि माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनी केले.

शाहूनगर येथील श्री. शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिना”च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, मा. नगरसेविका अनुराधा गोरखे , मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे हे उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष श्री बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. राजाराम वंजारी व राजेंद्र पगारे यांनी स्वागत केले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड साहित्य मंच चे “मायमराठीचा जागर” हे कविसंमेलन मान्यवर कवींच्या उपस्थितीत संपन्न झाले.

बाबू डिसोजा, सीमा गांधी, आय. के. शेख, सविता इंगळे, प्रदीप गांधलीकर, वंदना इन्नानी, मानसी चिटणीस,माधुरी विधाटे, सुनंदा शिंगनाथ, हेमंत जोशी, वर्षा बालगोपाल, माधुरी डिसूझा यांनी उत्तमोत्तम रचना सादर करून उपास्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मातृगंध संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्तरावर आयोजित निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन निबंधांचे अभिवाचन करण्यात आले. अभिवाचनात मातृगंध संस्थेच्या अध्यक्षा निलाक्षी काळे-सालके, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा उज्वला केळकर व मनीषा पाटील यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन भरत गायकवाड, नरेंद्र जयसिंगपूरे, दयानंद कांबळे, अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ यांनी केले. सूत्रसंचालन व्याख्याते मा. राजेंद्र घावटे यांनी केले. आभार प्रदर्शन राजाराम रायकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *