पिंपरी I झुंज न्यूज : देशातील गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या प्रगतीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे. देशाचा विकास या चार घटकांच्या विकासात दडलेला आहे. त्यामुळे या चार घटकांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी अर्थसंकल्पात प्राधान्याने मांडण्यात आल्या आहेत. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शंकर पांडुरंग जगताप यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार समाजातील शेवटच्या घटकांतील कल्याणासाठी काम करत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील प्रत्येक कुटुंबाच्या घराला पाणी, वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करत आले आहे.
देशातील गोरगरीबांच्या अन्ना संबंधीची समस्या मोदी सरकारने दूर केली आहे. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर मोदी सरकार भर देत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यासाठी ते देशातील प्रत्येकाला सक्षम करण्यासाठी काम करत आहेत.
आताच्या अर्थसंकल्पात देशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखी दोन कोटी घरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १ कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे १ लाख कोटींचा निधी राखीव ठेवून तरुणांना व्याजमुक्त देण्याचाही क्रांतीकारी निर्णय या अर्थसंकल्पात आहे. त्यामुळे संशोधन आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना मिळणार आहे. देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. भारताला विकासाच्या दिशेने आणखी पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे.