“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का…? (- एस एम देशमुख )

लेखन : – एस.एम देशमुख
(मुख्य विश्वस्त – मराठी पत्रकार परिषद)

“17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते.. अन्य जिल्ह्यातही शासकीय कार्यक्रम होतात.. मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?

हैदराबाद संस्थान आणि जंजिरा संस्थान यामध्ये बरेच साम्य आहे.. दोन्ही संस्थानात राजा मुस्लिम आणि बहुसंख्य प्रजा हिंदू होती.. जंजिरा संस्थान हैदराबाद संस्थानाच्या तुलनेत बरंच छोटं म्हणजे म्हसळा, श्रीवर्धन आणि मुरूड या तीन तालुक्याचंच असलं तरी दोन्ही राजांना पाकिस्तानचा पुळका होता.. हैदराबादचा नबाब जसा पाकिस्तानात जाण्याचा खटाटोप करीत होता तद्वतच जंजिरयाचा सिद्दीला देखील पाकिस्तानात जायचे होते.. त्यासाठी त्याचे प्रयत्नही सुरू होते.. त्यामुळे हे दोन्ही राजे सामिलनाम्यावर स्वाक्षरी करायला तयार नव्हते.. त्यामुळे तत्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानावर लष्करी कारवाई केली.. मराठवाड्यात या कारवाईला “पोलीस अ‍ॅक्शन” म्हणतात.. चार दिवसात निजाम शरण आला.. 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तेरा महिन्यांनी हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं..

जंजिरा संस्थानच्या बाबतीत पोलीस अ‍ॅक्शनची गरज पडली नाही.. मात्र सिद्धी स्वतंत्र भारतात विलीन होत नाही म्हटल्यावर स्थानिक जनतेनं नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला.. स्वातंत्र्य सैनिक संस्थानावर चाल करून गेले.. त्यांनी म्हसळा जिंकले, नंतर त्यांनी श्रीवर्धन कडं कूच केली.. श्रीवर्धन जिंकून हे स्वातंत्र्य सैनिक मुरूडचा ताबा घेणार होते.. मात्र तत्पुर्वीच सिध्दी मुंबईला गेला आणि त्यांनी मुख्यमंत्री खेर यांच्या समोर सामिलनाम्यावर स्वाक्षरी केली.. जंजिरा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साडेपाच महिन्यांनी स्वतंत्र भारतात विलीन झालं..

तो दिवस होता 31 जानेवारी 1948..
मात्र 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती.. त्यामुळे संस्थानातील जनतेला स्वातंत्र्याचा आनंद उपभोगता आला नाही.. जंजिरा मुक्तीचा लढा दु:खाच्या छायेत झाकोळून गेला .. नंतर या लढ्याची कायम उपेक्षाच होत राहिली .. जंजिरा मुक्ती लढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग होता, त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जाही मिळाला नाही.. पेन्शन वगैरे दूरची गोष्ट.. ही गोष्ट आमच्या लक्षात आली तेव्हा 2005 मध्ये या लढ्यातील तेव्हा हयात स्वातंत्र्यविरांचा मुरूडच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये रायगड प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.. त्यानंतर 31 जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय रायगड प्रेस कलबनं घेतला.. मात्र हा दिवस मराठवाडा मुक्ती दिना प्रमाणे सरकारी पातळीवर साजरा करावा अशी रायगड प्रेस क्लबची मागणी आहे.. दुर्दैवानं त्याकडे कोणी लक्ष देत नाही.. या मागं मतांचं गणित आहे हे उघड आहे.. परिणामतः रक्ताचा एक थेंबही न गळता स्वातंत्र्य मिळालेला जंजिरा मुक्तीचा लढा दुर्लक्षित राहिला .. हा इतिहास नव्या पिढीला माहितीच नाही.. हे संतापजनक आहे..

हैदराबादच्या नबाबाच्या तुलनेत जंजिरयाचा सिध्दी बराच सौम्य स्वभावाचा आणि विचारानं पुरोगामी होता असा दावा काही जण करतात.. त्यानं संस्थानात शैक्षणिक संस्था सुरू केल्या, पाण्यासाठी गारंबीसारखे बंधारे बांधले, वनाचं रक्षण केलं असंही सांगितलं जातं.. हे खरंही असेलही पण सिध्दी हा राजा होता आणि त्याचा स्वतंत्र भारतात विलीन व्हायला विरोध होता हे वास्तव दृष्टिआड करता येणार नाही.. देशातील अन्य संस्थानं भारतात विलीन होत असताना जुनीगड, काश्मीर, हैदराबाद प्रमाणेच जंजिरा संस्थान देखील भारतात विलीन व्हायला तयार नव्हतं.. अखेर जनतेच्या रेट्यापुढे सिध्दीला स्वतंत्र भारतात विलीन व्हावं लागलं हा इतिहास आहे आणि तो जाती, धर्माच्या नावाखाली कोणाला पुसता येणार नाही..

राजा कोणत्या जाती, धर्माचा होता हा मुद्दा गौण आहे.. त्याची मानसिकता स्वतंत्र भारतात विलीन व्हायची नव्हती.. त्याला म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड घेऊन पाकिस्तानात जायचं होतं.. भौगोलिकदृष्टय़ा या विभागाचं महत्व बघता असं काही झालं असतं तर त्याचे काय दुष्परिणाम झाले असते याचा विचार आपण करू शकतो..

जंजिरा लढ्याचा देदीप्यमान इतिहास आहे.. तो नव्या पिढीला माहिती नाही, तो जगासमोर यायचा असेल तर 31 जानेवारी हा दिवस किमान रायगड जिल्ह्यात जंजिरा मुक्ती दिन म्हणून सरकारने साजरा करावा अशी रायगडमधील पत्रकारांची मागणी आहे.. सरकारनं मतांचा, जाती, धर्माचा विचार न करता एक ऐतिहासिक सत्य म्हणून या घटनेचा विचार करावा आणि पत्रकारांची मागणी मान्य करावी अशी आमची विनंती आहे..
जंजिरा मुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *