– भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा संकल्प
– नवी सांगवी येथे अटल महाआरोग्य विनामूल्य शिबीर
पिंपरी I झुंज न्यूज : वारकरी, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कायम पुढाकार घेणाऱ्या लोकनेते आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ९ वर्षांपूर्वी अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराची सुरूवात केली. शहरासह राज्यातील तळागाळातील घटकाची रुग्णसेवा व्हावी, हा यामागील उद्देश्य होता. त्यांनी सुरु केलेली आरोग्यसेवेची परंपरा अखंडित रहावी व प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध व्हावी, हाच अटल संकल्प घेवून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रग्णसेवेचे व्रत अविरतपणे जोपासणार आहे, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी १० वेळेत या शिबिरात नागरिकांना सहभागी होता येणार आहे. याबाबत जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली.
यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजपा शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनूप मोरे, दक्षिण भारत आघाडीचे राजेश पिल्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांनी ९ वर्षांपूर्वी अटल विनामूल्य आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. प्रतिवर्षी लाखो सर्वसामान्य कुटुंबातील गरजू नागरिक या शिबिराचा घेत आहेत. गतवर्षी दि. ३ जानेवारी रोजी लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले होते. यावर्षी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर’ चे आयोजन करण्यात आले.
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, शहराध्यक्ष शंकर जगताप आणि स्व. लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराने या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. रुग्णसेवेचा हा वसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.
महाराष्ट्रातील नामांकीत रुग्णालयांचा समावेश…
शिबिरामध्ये ससून हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, वायसीएम, टाटा मेमोरीअल, मुंबई, कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल, आदित्य बिर्ला, जहांगीर, दिनानाथ मंगेशकर, सह्याद्री, संचेती, पुना हॉस्पिटल, भारती, इन्लॅक्स बुधराणी इन्स्टिट्यूट, एच. व्ही. देसाई, व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य, चिंचवड, एम्स हॉस्पिटल, सिंम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, एमआयएमईआर मेडिकल कॉलेज, डॉ. बीएसटीआर हॉस्पिटल, श्रीमती काशीबाई नवले, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, रुबी अलकेअर, देवयानी, ओम, श्री हॉस्पिटल क्रिटीकेअर आणि तृमा सेंटर, कोहाकडे, सनराईज, आयुर्वेदिक न्युरो थेरपी, नारायण धाम, नॅशनल आयुष मिशन, स्टर्लिंग, ज्युपिटर, सूर्या मदत अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशी महाराष्ट्रातील नामांकीत रुग्णालये सहभागी होणार आहेत.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी ओळख व पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशनकार्ड) आणि पूर्वी काही आजार असल्याच त्याचे कागदपत्रे व मेडिकल रिपोर्ट सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी ९८५०१७११११ आणि ७५७५९८११११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॅन्सरसह विविध तपासण्या मोफत…
शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, एक्स रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासण्या आणि डायलेसीसही मोफत करण्याची सुविधा आहे. दंतरोग तपासणी आणि उपचार यासह हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण किडनी, विकास व प्रत्यारोपण, कॉकलर इन्प्लान्ट, लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्यांचे आजार, हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदूची शस्त्रक्रिया, आयुर्वेद उपचार, मुत्र मार्गाचे विकार, त्वचा विकार, फाटलेली टाळू व ओठांवरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलीप्सी फिट येणे, कान-नाक-घसा, अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, दंत चिकित्सा, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, स्त्री रोग, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया, मोफत अँन्जोग्राफी, अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, मोफत चष्मे वाटप, आयुर्वेदिक, न्युरोथेरपी, आयुर्वेद, योगा, नॅकोपॅथी, उनानी सिद्धा होमिओपॅथी, कायरोपॅक्ट्रीक थेरपी अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे, सर्व नागरिकांना या निमित्ताने मोफत औषधे दिली जाणार आहेत.
अटल विनामुल्य शिबिराची वैशिष्ट्ये…
शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धती आहेत. सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यामार्फत ऑफलाइन नोंदणी करून घेतली जात आहे. त्याबरोबर येणे सोशल मीडिया विविध प्लॅटफॉर्म्स या माध्यमातून देखील ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. महाराष्ट्रातील नामांकीत रुग्णालयांची युनिट आणि सुमारे ६०० हून अधिक डॉक्टर्स, तज्ञ व पॅरामेडिकल स्टाफ शिबिरासाठी कार्यरत राहणार आहे. विविध रुग्णालयांचे २७० हून अधिक रोग निदान स्टॉल उभारल्या आहेत.
शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, एक्स रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासण्या आणि डायलेसीसही मोफत करण्याची सुविधा आहे. डायलेसीस सायकल पूर्ण करण्यात येणार आहे. रक्त तपासणीचा रिपोर्ट मोबाईलवर पाठवण्याची सुविधा केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच अत्याधुनिक प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय, जयपूर फूट, कॅलिपर्स तसेच दिव्यांगकरिता मोफत व्हीलचेअर्स, तीन चाकी सायकल, कुबड्या, स्टिक्स इत्यादी साहित्याचे नाव नोंदणी करून मोफत वाटप केले जाणार आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्राथमिक स्वच्छतेसाठी फिरते शौचालय, पार्किंगसाठी व्यवस्था, चहा-नाष्टा, दोन वेळचे भोजन, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, अग्निशमनचे दोन बंब, प्रत्येक स्टॉलवर अग्निशमन यंत्र, सीसीटीव्हीसह सुरक्षा व्यवस्था, खासगी सुरक्षारक्षक आदी गोष्टी उपलब्ध केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर पात्र रुग्णांचे उत्पन्नाचे तसेच रहिवासी दाखले त्वरित उपलब्ध व्हावेत, यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरासाठी शहराच्या अनेक भागातून नागरिक सहभागी होणार आहेत ही नागरिकांना ये-जा करण्यासाठी पीएमपीएलच्या वतीने बसेसची मोफत उपलब्ध केली आहे.