शहरातील विकासकामांसाठी गरज कालबद्ध नियोजनाची !

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची सूचना
महापालिका आयुक्तांसोबत विकासकामांची पाहणी

पिंपरी । झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. ज्याद्वारे विकासकामांना गती देता येईल. शहराच्या सर्वांगीण विकासासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिकेतून प्रकल्प मार्गी लावावेत, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवी सांगवी परिसरातील विविध प्रस्तावित विकासकामांची पहाणी केली. पहाणी दौऱ्यामध्ये सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव आदी ठिकाणच्या विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापूरे, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, हर्षल ढोरे, उषा मुंडे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, शारदा सोनावणे, श्री गणेश सहकारी बँकेचे संचालक संजय जगताप, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, भाजपा शहर चिटणीस हिरेन सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी सांगवी येथील संगमनगर, ममतानगरमार्गे बोपोडी, औंधकडे जाणाऱ्या पुलाच्या संदर्भात चर्चा झाली. या पुलाच्या बाबतीत कृषी विभागाच्या काही तांत्रिक अडचणी असून, त्या लवकरच मार्गी लावण्यात येतील. तसेच, मधुबन सोसायटी गल्ली नंबर १ ते ९ येथील १२ मीटरचा रस्ता, नवी सांगवी येथील कृष्णा चौक येथे २० मीटरच्या रस्त्यासंदर्भात तसेच रामनगर–यमुना सोसायटी, मयूर नगरीच्या शेजारचा रस्त्याच्या कामाला गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

शंकर जगताप म्हणाले की, नागरिकांना पायाभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. यामुळे शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा या दर्जेदार असाव्यात, यासाठी आम्ही नेहमीच आग्रही आहोत. किमान पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रशासनाने मुलभूत सुविधांची निर्मिती करावी, अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया :
“शहराचे वाढते नागरीकरण आणि वाहतूक समस्या याचा विचार करुन महापालिका प्रशासनाने प्रस्तावित रस्ते आणि नदी पात्रावरील पुलांची कामे तातडीने हाती घेतली पाहिजेत. तसेच, मुख्य रस्त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. या दृष्टीकोनातून प्रशासकीय प्रमुख शेखर सिंह यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात निश्चितपणे प्रस्तावित कामांना गती दिली जाईल.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *