चाकणमध्ये भारतातील सर्वात मोठी छकडी शर्यतीचा थरार !

– ६०० बैलगाडा अन्‌ ७० हजार शर्यतप्रेमींचा प्रतिसाद
– आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पिंपरी I झुंज न्यूज : तब्बल ६०० छकडी बैलगाडा आणि सुमारे ७० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत चाकणमधील घाटावर भारतातील सर्वात मोठी छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळाला. कात्रज, पुणे येथील निसर्ग गार्डनच्या सुंदर आणि हरण्या जोडीने मानाचा ‘महान भारतकेसरी’ किताब पटकावला आणि थार गाडी मिळवली.

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विकास नाईकवाडी यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात प्रथमच छकडी शर्यत (बैलगाडा) स्पर्धा आयोजित करण्यात आली. चाकण येथील बैलगाडा घाटावर “महान भारतकेसरी” शर्यती अत्यंत उत्साहात पार पडली.

या स्पर्धेसाठी मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश आदी राज्यांमधून गाडामालक सहभागी झाले. थार गाडी, टेम्पो, ट्रॅक्टर, ७० दुचाकी अशा भव्य बक्षीसांची उधळण यानिमित्ताने करण्यात आली. एकूण ६०० छकडी आणि सुमारे ७० हजार बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेचा प्रत्यक्ष घाटात आनंद घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठी ही स्पर्धा ठरली आहे.

विकास नाईकवाडी म्हणाले की, राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू केलेल्या या लढ्याला यश मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. त्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमी आणि शेतकऱ्यांमध्ये आमदार लांडगे यांच्याबाबत आदराची भावना आहे. त्यामुळेच आम्ही यावर्षी भारतातील सर्वात मोठी छकडी बैलगाडा शर्यत अर्थात महान भारत केसरी स्पर्धा भरवली. त्याला अपेक्षेप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

“बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्रातील शेतकरी, भूमिपूत्रांचे अतूट नाते आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेसह सर्वच संस्था, संघटना आणि शर्यतप्रेमींनी योगदान दिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लढ्याला मोठे पाठबळ दिले. हा शेतकऱ्यांचा थरारक खेळ टिकला पाहिजे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थचक्र सक्षम होत असल्यामुळे केलेल्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान वाटते. स्पर्धा आयोजकांने आभार व्यक्त करतो.
– (महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.)

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : निसर्ग गार्डन, कात्रज, पुणे (संदर आणि हारण्या), २- महालक्ष्मी प्र. विटा (बब्या आणि बावऱ्या), ३- भैरवनाथ प्र. बापुरसाहेब भाडळे वाघोली, उमेश शेठ फुरसुंगी (सरपंच आणि २२११ पिस्टन), ४- स्वामी साई सचिन घरत मोहीलशेठ धुमाळ, सुसगाव (बकासूर आणि सर्जा), ५- जोतिर्लिंग जितेंद्रशेठ देशमुख (लेंगरे) (चिक्या आणि वादळ), ६- स्वराज घिगे नाच्या ग्रुप मोशी (बलमा आणि लक्ष्मणराव), ७-श्रावणी दत्ता शिंदे (पाटखळ) (शिवराज आणि राजा), ८- आईगावदेवी प्र. रणवीर राहुलभाई पाटील (आ. कल्याण) (सिकंदर आणि वायर), ९-चेंडू ग्रुप मंगळापूर नेवसा अमोलशेठ ढगे (हारण्या आणि चिमण्या), १०- पै. सचिनशेठ चव्हाण, वाई (८१८१)(सिकंदर आणि वायर).

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *