शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील सुपुत्र, शेतकरी कुटुंबातील युवक श्री रमेश बांडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून व्यवस्थापन शास्त्रातील पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्यांनी पी एच डी अंतर्गत संशोधनासाठी निवडलेल्या विषयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च अँड रिकग्निशन कमिटी कडून मान्यता देण्यात आली असून तसे निवडीबाबतचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
आकुर्डी येथील डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या रिसर्च सेंटर मधून डॉ अमिताभ पटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बांडे हे आपले संशोधन कार्य पूर्ण करणार आहेत. श्री रमेश बांडे यांनी सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन व विकास यावर संशोधन करण्याचे ठरविले असून त्याकरिता “विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा व्यवसाय विविधीकरणाच्या माध्यमातून विकास एक तुलनात्मक अभ्यास” हा संशोधन विषय पी एच डी करिता निवडला आहे.
रमेश बांडे यांचे प्राथमिक शिक्षण उरळगाव या ठिकाणी झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण न्हावरे येथील मल्लिकार्जुन विद्यालय येथे पूर्ण झाले आहे. शिरूर येथील चां. ता. बोरा महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषय घेऊन बी ए ची पदवी मिळवली तर पुढे अहमदनगर येथील डॉ वि. विखे पाटील व्यवस्थापन महाविद्यालयातून एम बी ए ची पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे.
सध्या ते व्यवस्थापन, बँकिंग, महिला सबलीकरण, तसेच सहकार विषयातील तज्ञ प्रशिक्षक म्हणून विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये व्याख्याते म्हणून सेवा देत आहेत. या माध्यमातून सहकारी चळवळ बळकटीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ते एक प्रेरणादायी वक्ते म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.
रमेश बांडे यांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, ऐतिहासिक अशा सर्वच क्षेत्रात सतत वावर असतो. तसेच गिरिप्रेमी गृपच्या माध्यमातून गडकिल्ले ट्रेकिंग करत असतात. गावातील अखिल उरळगाव नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून ते आपले सामाजिक योगदान देत असतात. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील अभ्यासामुळे सामाजिक आर्थिक विकासात नक्कीच हातभार लागेल अशी भावना या विषयातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या प्रवासास मित्र मंडळींनी व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.