पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मोशीतील गायरान जागेचा पर्याय !

– पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची पाहणी
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि पोलीस परेड ग्राउंडसाठी मोशी येथील गायरान जमीन उपलब्ध करण्यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आज प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस सहआयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती २०१८ मध्ये करण्यात आली. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. तसेच, २०१४ पासून आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तालयासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. त्याला यश मिळाले. आयुक्तालयाचे कामकाज २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अद्याप आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळलेली नाही.

दरम्यान, देहूगाव गायरान येथील ६५ एकर जागा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी देण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, या जागेला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सदर जागा उपलब्ध होण्यास विलंब आणि अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मोशी येथील गायरान जागेत पोलीस आयुक्तालय उभारावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरातील काही पोलीस ठाण्यांचे विभाजनही करण्यात येणार आहे. पोलीस परेड ग्राउंड आणि अन्य कामकाज एकाच आणि मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येईल. मध्यवर्ती ठिकाण म्हणून मोशीतील गायरान जमिनीवर पोलीस आयुक्तालयाची भव्य इमारत उभारावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. पोलीस आयुक्तांनी आज जागेची पाहणी केली. यासाठी आता महापालिका,जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *