सांगवी पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस फौजदार ACB च्या जाळ्यात…

गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सांगवी I झुंज न्यूज : बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल न करुन कारवाई न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून 25 हजार रुपये लाच स्वीकारताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुनील शहाजी जाधव (वय-49) असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई बुधवारी (दि.18) पिंपळे सौदागर पोलीस चौकी येथे केली.

याबाबत एका 45 वर्षाच्या महिलेने पुणे एसीबी कार्य़ालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे घराचे बांधकाम पिंपळे सौदागर येथे चालू असून या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट बांधकाम व्यवसायिक कराळे यांना दिले होते. घराचे बांधकामाबाबत कॉन्ट्रॅक्टर कराळे व तक्रारदार यांच्यात करार झाला होता. करारानुसार बांधकाम व्यवसायिक यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी कॉन्ट्रॅक्टरचे बांधकामाचे साहित्य ताब्यात घेतले होते. हे साहित्य कॉन्ट्रॅक्टर हे तक्रारदार यांच्याकडे मागत होते. परंतु बांधकाम पूर्ण झाल्यावर बांधकाम साहित्य देण्यात येईल असे तक्रारदार यांनी कराळे यांना सांगितले.

त्यामुळे कराळे यांनी तक्रारदार यांचे विरोधात सांगवी पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. या तक्रारीवरून तक्रारदार यांच्या विरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी सुनील जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला 60 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत महिलेने पुणे एसबीकडे तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता जाधव यांनी 60 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 50 हजार रुपये दोन टप्प्यात स्वीकारण्याचे मान्य केले.

बुधवारी पिंपळे सौदागर पोलीस चौकीत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील 25 हजार रुपये लाच स्वीकारताना सुनील जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस अंमलदार प्रवीण तावरे, कोमल शेटे, सौरभ महाशब्दे, चव्हाण यांच्या पथकाने केली.

              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *