मोशीत उभारणार नामांकीत ‘आयआयएम’ ची शाखा !

– आयुक्त शेखर सिंह यांचा जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव
– आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर हालचालींना वेग

पिंपरी I झुंज न्यूज : शिक्षण क्षेत्रातील केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) ची शाखा पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने संबंधित संस्थेलाही पत्र पाठवले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नामांकीत शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. तसेच, रोजगार आणि उद्योजकता याला चालना मिळावी. या संकल्पनेतून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची शाखा शहरात व्हावी. त्यासाठी जागा उपलब्ध करावी आणि पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करुन संबंधित संस्थेकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

मोशी येथील ६० एकर शासकीय जागेत आयआयएम- नागपूर संस्थेची विस्तारीत शाखा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. या ठिकाणी शासकीय गायरान जागेमधून १२ मीटर एक आणि १८ मीटरचे तीन रस्त्यांचे नियोजन आहे. सदर जागा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. ६० एकर जागेत आयआयएम उभारण्याचा विचार आहे. याबाबत वैधानिक कार्यवाही करुन शासनाची मंजुरी मिळावी, असे सकारात्मक पत्र महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले आहे.

पिंपरी-चिंचवडची ओळख जगाच्या नकाशावर…
एकेकाळी कचरा डेपोचा परिसर म्हणून उल्लेख केला जाणाऱ्या मोशीला राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्थेचे ठिकाण म्हणून ओळख प्राप्त होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे कार्यान्वयीत झाले. पिंपरी-चिंचवड न्यायालयाची अत्याधुनिक सोयी-सुविधांची भव्य इमारत मोशीत उभारले जात आहे. विशेष म्हणजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखाही शहरात होत आहे. आता आयआयएम संस्था शहरात झाल्यास पिंपरी-चिंचवडची ओळख जगाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार आहे.

‘आयआयएम’ करणार जागा मागणी प्रस्ताव…
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट संस्थेने विहित नमुन्यात अ, ब, क, ड तक्त्यात जागा मागणी प्रस्ताव अपर तहसिलदार पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयास करावा. ज्यामुळे पुढील कार्यवाही करणे सोईचे हाईल, असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर यांना पाठवले आहे. या संस्थेकडून जागा मागणी प्रस्ताव आल्यानंतर जागेचे पाहणी होईल. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करुन शाखा विस्तारासाठी चालना मिळणार आहे.

“जिल्हा प्रशासनाने आयआयएम संस्थेला पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार जागा मागणी प्रस्ताव मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड अपर तहसिल कार्यालयामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल. पुणे पिंपरी-चिंचवड आणि मुंबई अशी मोठी शहरे, औद्योगिक पट्टा, आयटी हब यासह भविष्यातील शहरांचे वाढते नागरीकरण याचा विचार करता ‘कनेक्टीव्हीटी’च्या दृष्टीने मोशीतील गायरान जागेत आयआयएम संस्थेचे शाखा उभारणे शहराच्या हिताचे आहे. त्यानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *