दिल्लीतील पत्रकारांच्या घरावर छापे टाकल्याने मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध…
मुंबई । झुंज न्यूज : देश हुकूमशाहीकडे वेगानं वाटचाल करतोय याची चाहूल केव्हाची लागली आहे.. आजची ताजी बातमी त्याचीच पुढची पायरी आहे. सत्ताविरोधी पत्रकारांना देशात जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जाऊ लागलंय. आज सकाळी सकाळी दिल्लीहून जी बातमी आली आहे, ती माध्यमांचा भविष्यकाळ कसा असू शकेल याची जाणीव करून देणारी आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी दिल्लीतील पत्रकार आणि लेखकांच्या घरावर छापे घातले आहेत. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित आहेत. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह अनेक पत्रकारांचे मोबाईल लॅपटॉप जप्त करण्यात आलेत. याशिवाय पत्रकार संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरी पोलिसांनी छापे घातले आहेत. यातील काही जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहे.
माध्यमांचा आवाज बंद करून देशातील पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करण्यासाठी केल्या गेलेल्या या कारवाईचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, आणि डिजिटल मिडिया परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे..
हा लढा केवळ माध्यमांचा नाही, लोकशाही आणी माध्यम स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनतेनं ही पुढं येऊन व्यक्त झालं पाहिजे असं आवाहन एस.एम.देशमुख यांनी केलं आहे.